पावसाळा, निवडणुका व दिवाळीच्या सुट्टय़ा यांचा ब्रेक संपल्यानंतर पालिका आता दक्षिण मुंबईतील तीन उड्डाणपुलांचे काम हाती घेणार आहे. वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाल्यावर केम्प्स कॉर्नर, प्रिन्सेस स्ट्रीट आणि महालक्ष्मी येथील उड्डाणपुलांची दुरुस्ती नोव्हेबरअखेरीस सुरू होईल
या वर्षी मे महिन्यात भायखळा येथील ग्लोरिया चर्च उड्डाणपुलाची दुरुस्ती करताना वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला होता. २ मे पासून दहा दिवसांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र वाहतूक विभागानेही याबाबत वेळीच पूर्वसूचना दिली नसल्याने शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
हा उड्डाणपूल अरुंद असल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे मत आहे. यावेळी पुलांची दुरुस्ती करताना अशी वाहतूक कोंडी ओढवू नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
महालक्ष्मी तसेच केम्प्स कॉर्नर येथील उड्डाणपूल रुंद असून काही भाग खुला ठेवून दुरुस्तीचे काम करता येईल, असे मुख्य अभियंता (पूल) एस. ओ. कोरी म्हणाले. याबाबत वाहतूक पोलिसांकडे पत्र पाठवले जाणार असून परवानगी मिळाल्यावर या पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात येतील.
गेल्या वर्षीचा भायखळा उड्डाणपुलाचा अनुभव तसेच दक्षिण मुंबईतील वाहतुकीची समस्या लक्षात घेता तीनही पुलांचे काम एकत्रितरित्या सुरू केले जाणार नसल्याचे कोरी यांनी स्पष्ट केले.
मात्र या उड्डाणपुलांच्या दुरुस्तीला नेमके किती दिवस लागणार आहेत, याचा निश्चित अंदाज पालिका अधिकाऱ्यांना नाही.
पुलांचे सांधे दुरुस्त करणे हे अधिक जोखमीचे काम असते. त्याला नेमका किती वेळ लागेल, याची पाहणी बाकी आहे.