वायू, ध्वनी व जल प्रदूषण करणाऱ्या या जिल्ह्य़ातील २४ उद्योगांवर उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने दंडात्मक कारवाई करून ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते, परंतु एकाही उद्योगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांचे पालन केले नसल्याची माहिती समोर आली आहे.
प्रदूषणात देशात चौथ्या क्रमांकावर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्य़ात प्रदूषण कमी व्हावे म्हणून उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने या जिल्ह्य़ातील २४ उद्योगांची १ कोटी १८ लाखाची बॅंक गॅरंटी जप्त केली. हे करताना संबंधित उद्योगांनी त्या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुचविलेल्या आवश्यक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक होते, परंतु एकही उद्योग या नियमांचे पालन करत नसल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. गेल्याच महिन्यात पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांनी निरीच्या पर्यावरण तज्ज्ञांसोबत या जिल्ह्य़ातील उद्योगांची पाहणी करून प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले होते, परंतु उद्योग प्रदूषण कमी करण्याबाबत गंभीर नसल्याचे समोर आले. याला पालकमंत्री संजय देवतळे यांची मवाळ भूमिका कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे.कर्नाटका एम्टा दहा लाख रुपये रेल्वे साईडिंगकरिता व दोन लाख खाणीकरिता, तसेच ९ लाख इतर हमीचे जप्त केले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र दहा लाख, मे. अंवथा पॉवर अॅन्ड इन्फास्ट्रक्चर दहा लाख, वर्धा पॉवर कंपनी, वरोरा दहा लाख, तसेच संमतीपत्र अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ लाख ५० हजार, मे. वेकोलि दुर्गापूर खुली कोळसा खाण दोन लाख, मे. बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रॉडक्ट लि. ४५ लाख, वेकोलि न्यू माजरी ओपनकास्ट माईन ५ लाख, वेकोलि भटाडी ओपनकास्ट माईन एक लाख, वेकोलि हिंदूस्थान लालपेठ ओपनकास्ट दोन लाख, सनफ्लॅग स्टील कंपनी पाच लाख, शारदांबिका पॉवर प्लान्ट, चिमूर एमआयडीसी एक लाख, मे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. चंद्रपूर फेरो अलॉय प्लान्ट बारा लाख, मे. वेकोलि सेंट्रल वर्कशॉप ताडाळी दोन लाख, मे. मल्टी ऑरगॅनिक्स प्रा.लि. एमआयडीसी चंद्रपूर साडेतीन लाख, मे. ग्रेस इंडस्ट्रीज लि. चंद्रपूर दोन लाख रुपये, तसेच इतर दंड २.५० हजार, मुरली इंडस्ट्रीज लि. पाच लाख, माणिकगड सिमेंट कंपनी दोन लाख, वेकोलि दुर्गापूर रय्यतवारी कॉलरी दोन लाख, मे. अंबुजा सिमेंट कंपनी पाच लाख, ग्रेटा एनर्जी पॉवर लि. पाच लाख, लॉईड मेटल एनर्जी लि. दहा लाख, मे. दुर्गापूर ओपनकास्ट माईन्स एक लाख, शारदाअंबिका पॉवर लि. चिमूर अडीच लाख व गोपानी आयर्न अॅन्ड स्टील प्रा. लि. ताडाळी एक लाख, अशी एकूण २४ उद्योगांची १ कोटी ८० लाखाची बॅंक गॅरंटी जप्त केली होती. ही बॅंक गॅरंटी जप्त करताना प्रदूषण होणार नाही, याची काळजी उद्योगांनी घ्यायची असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते, परंतु त्याकडेही उद्योगांनी पाठ फिरवली आहे.
पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या भद्रावती व वरोरा तालुक्यातील एमआयडीसीच्या उद्योगातून मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत आहे. यासोबतच घुग्घुस शहरातील वेकोलिच्या खाणी, एसीसी सिमेंट व लॉयड आकाशात विषारी धूर सोडत आहे. तीच गत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची आहे. चंद्रपूर एमआयडीसीतील अनेक उद्योग इरई नदी, तसेच नाल्यांच्या पात्रात विषारी रासायनिक मिश्रण सोडत असल्याने नदीचे पात्र दूषित झाले आहे, तर बल्लारपूर पेपर मिल व परिसरातील अन्य उद्योगांमुळे वर्धा नदीचे पात्र विषारी झाले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दंडात्मक कारवाई केल्यानंतरही उद्योग व्यवस्थापन यासंदर्भात तशी उपाययोजना करत नसल्याने उद्योग अधिकाऱ्यांना ऐकत नाहीत की, आणखी काही गोष्ट आहे, अशीही शंका उपस्थित होत आहे.
ऑटोचे प्रदूषण जीवघेणे
या शहरात आज तीन ते साडेतीन हजार ऑटो रोज धावतात. यातील अध्र्यापेक्षा अधिक ऑटो केरोसिनवर चालत असल्यामुळे रस्त्याने नेहमी प्रदूषित धूर सोडत असतात. ऑटोच्या या प्रदूषणामुळे चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. त्याचा परिणाम या शहरातील बहुतांश दुचाकीस्वार चेहऱ्यावर स्कॉर्फ बांधून गाडय़ा चावलतात. रस्त्याने ऑटो जात असेल तर त्याच्या मागे एकही वाहन राहत नाही. कारण, ऑटोच्या सायलेन्सरमधून निघणारा प्रदूषित धूर आहे. इतकी वाईट अवस्था या शहरातील ऑटोंची झालेली आहे. तरी उपप्रादेषिक परिवहन कार्यालय व वाहतूक शाखेच्या आशीर्वादाने प्रदूषण करणारे हे ऑटो सुरूच आहे.
शहरातील लोक ऑटोच्या सायलेन्सरमधून निघणाऱ्या प्रदूषित धुरामुळे खो खो करत आहेत, तर दुसरीकडे खालच्या छायाचित्रात उद्योगांच्या प्रदूषणाने शहराला असे प्रदूषणाच्या विळख्यात घेतले आहे. एका चंद्रपूरकरानेच हे छायाचित्र फेसबुकवर अपलोड करून चंद्रपूरच्या प्रदूषणाची समस्या छायाचित्राच्या माध्यमातून कथन केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा