मराठय़ांचे आरमार केंद्र म्हणून ओळख असलेल्या कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामधील खाडीत मोठय़ा प्रमाणात गाळ साचल्याने तसेच प्रदूषित पाण्याचे प्रमाण वाढत असल्याने या भागातील नौकानयन अत्यंत त्रासदायक आणि धोकादायक बनले आहे. जीवरक्षक, बचाव बोट, सुरक्षा जॅकेट या सुरक्षा संसाधनांच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे येथील नौकानयन म्हणजे जिवाशी खेळ आहे. नौकानयन करणाऱ्या बोटींशिवाय या भागात अन्य बचाव व्यवस्थाच नसल्याने दुर्घटना घडल्यास ती पर्यटकांच्या जिवावर बेतू शकते. येथील नौकानयन सागरी सीमा सुरक्षा दलाच्या अखत्यारीत येत असूनही या विभागाच्या दुर्लक्षामुळे टिटवाळ्यासारखी दुर्घटना घडली तर येथे मोठा अनर्थ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कल्याण पश्चिमेमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेश घाटावर संध्याकाळी नागरिक विरंगुळ्यासाठी येत असून या भागातील खाडीमध्ये नौकानयन करण्यासाठी खाजगी संस्थेला सागरी सीमा सुरक्षा दलाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे. या संस्थेद्वारे एका मोठय़ा दुमजली बोटीमध्ये प्रवाशांना घेऊन खाडीमध्ये एक फेरी मारण्यात येते. गेट-वे ऑफ इंडिया परिसरामध्ये सुरू असलेल्या फेरी बोटीप्रमाणे हे नौकानयन होत असले तरी मुंबईच्या तुलनेत येथील सुरक्षा व्यवस्था मात्र धक्क्यावरच असल्याचे दिसून येते. शेकडोंच्या संख्येने बोटीमध्ये प्रवासी असूनही त्या तुलनेत कोणतीच साधने उपलब्ध करून दिली जात नाहीत. बोटीची अवस्था जुनी असून लहान मुले, महिला मोठय़ा संख्यने या बोटीतून प्रवास करतात. अशा वेळी त्यांना सुरक्षा जॅकेट उपलब्ध करून दिले जात नाही. या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. खाजगी चालक आणि काही तरुण या बोटीमध्ये नागरिकांना चढण्या-उतरण्यास मदत करत असले तरी दुर्घटना घडल्यास लोकांना वाचवण्यासाठी पुरेसे प्रशिक्षक येथे नाहीत. रात्री उशिरापर्यंत या भागात नौकाविहार होत असून पार्टीसाठीसुद्धा ही नौका उपलब्ध करून दिली जात असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा