ऐरोलीमध्ये सात थर रचले आणि एकच जल्लोष झाला. पण उतरताना थर कोसळले आणि उदयोन्मुख शरीरसौष्टवपटू त्यात जायबंदी झाला. किरकोळ वाटणारी दुखापत गुढघ्यावर बेतली आणि त्याला त्यावर शस्त्रक्रियेचा उतारा घ्यावा लागला. गेल्या वर्षांपासून व्यायामापासून वंचित राहिलेल्या या तरुणाने दहीहंडीतील थरांना आता कायमचाच रामराम ठोकला आहे. मात्र याच वर्षभरात तो एक उत्तम शरीरसौष्टवपटू बनला असता. हे स्वप्न मात्र अजून दूरच राहिले आहे.
काळाचौकीतील फेरबंदर परिसरातील अभिनंदन गोविंदा पथक सात थराची दहीहंडी लीलया फोडत असे. ऐरोलीत या पथकाने अगदी सहजपणे सात थर रचले. पण सलामी देऊन गोविंदा खाली उतरताना थर कोसळला आणि हितेन खामकर (२३) याच्या गुढग्याला दुखापत झाली. त्यावेळी त्याला काहीच वाटले नाही. मात्र दुसरी दहीहंडी फोडताना त्याला थरावर चढताच येईना. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तात्पुरते उपचार केल्यानंतर त्याला घरी पाठविण्यात आले. फेरबंदरमधील फिटनेस हार्मनी व्यायामशाळेतील हा हाडाचा व्यायामपटू. गेल्याच वर्षी व्यायामशाळेत भरविण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत तो दुसरा आला होता. खांद्यावर उभे राहून न डगमगता वरच्या गोविंदांचे वजन पेलण्यात तरबेज असल्यामुळे त्याला तिसऱ्या थरावर पाठविण्यात येत होते.
जायबंदी हितेनचा गुढगा काही दिवसांनंतर पुन्हा दुखू लागला. व्यायामही करणेही त्याला अवघड बनले. अखेर तपासणी केल्यानंतर त्याच्या गुढग्याच्या लिगामेन्टला मार बसल्याचे उघडकीस आले. जानेवारीमध्ये हितेनच्या गुढघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर सहा महिने त्याच्या चालण्याचा वेग मंदावला होता. आता किमान वर्षभर तरी त्याला व्यायामाला मुरड घालावी लागणार आहे. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने परळच्या एमडी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असतानाच त्याला नोकरी करावी लागली. सकाळी नोकरी आणि संध्याकाळी शिक्षण असा त्याचा दिनक्रम आहे. आर्थिक स्थिती बेताची असताना गुढघ्यावर करावा लागलेला खर्चसुद्धा कुटुंबाला परवडणारा नव्हता. या सगळ्यांचा मनस्ताप झाल्याने हितेनने यंदा गोविंदा पथकाबरोबर केवळ बघे म्हणून जाण्याचे ठरवले आहे. कोणत्याही परिस्थितीत थरात उभे राहायचे नाही असा निश्चयच त्याने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा