शहरातील मतदार याद्यांमध्ये हजारो खोटी नावे समाविष्ट करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर अध्यक्ष युवराज करनकाळ यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी प्रकाश महाजन व तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना निवेदनही देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सध्या मतदारांची प्रारुप यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करण्यात येत आहेत. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये असा शासनाचा उद्देश असला तरी काही जणांकडून मात्र खोटी नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचा कार्यक्रम सुरू झाला असल्याचे करनकाळ यांचे म्हणणे आहे. यादी तयार करणारे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविषयी कोणतीही तक्रार नाही. परंतु वेगवेगळ्या भागातील काही जणांकडून जाणीवपूर्वक खोटी नावे मतदार म्हणून पुढे करण्यात येत असल्याने ४० ते ५० हजार बनावट मतदार मतदानाच्या दिवशी सक्रिय होऊ शकतील, असा धोका करनकाळ यांनी व्यक्त केला आहे.
विभागनिहाय तयार केल्या जाणाऱ्या या प्रारुप मतदार याद्यांचा गैरफायदा विशिष्ट लोक घेऊ शकतील. यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, खोटी नावे आढळल्यास ती यादीतून काढून टाकण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदारांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात माजी आमदार किसन खोपडे, माजी उपमहापौर इस्माईल पठाण, भिवसन अहिरे व भटू महाले यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा