ठाणे स्थानक परिसरात सोमवारी दुपारी उभ्या असलेल्या एकाच नंबरच्या दोन रिक्षा ठाणे वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्यांपैकी एक रिक्षा कागदपत्रे नसतानाही बोगस नंबरच्या आधारे शहरात चालविण्यात येत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय जुन्या रिक्षा बाद करून त्यांचा परवाना नव्या रिक्षांवर चढवितात, तसेच जुन्या बाद झालेल्या भंगार रिक्षांचे सुमारे १० ते १२ तुकडे करतात. असे असतानाही ठाणे वाहतूक पोलिसांच्या हाती जुनी बाद झालेली रिक्षा लागल्याने ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्य पद्धतीविषयी आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
ठाणे स्थानक परिसरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा येत असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या ठाणे नगर युनिटचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने या दोन्ही रिक्षांचा शोध सुरू केला होता. सोमवारी दुपारी ठाणे स्थानक परिसरात पोलीस नाईक विश्वनाथ जाधव कार्यरत होते. त्या वेळी त्यांना एकाच नंबरच्या दोन रिक्षा उभ्या असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी या दोन्ही रिक्षा ताब्यात घेऊन रिक्षाचालकांकडे चौकशी केली. त्यामध्ये एक रिक्षा सावकरनगर येथे राहणारे गुरुलिंग खंडाळे यांची असून त्यांच्याकडे रिक्षाची कागदपत्रे असल्याचे निदर्शनास आले, तर दुसरी रिक्षा कळव्यात राहणारा आझाद त्रिभुन गिरी याची असून त्याच्याकडे रिक्षाची कागदपत्रे नाहीत, तसेच रिक्षा चालविण्याचा परवानाही नाही, असेही त्यांच्या निदर्शनास आले. त्याने ही रिक्षा अकबर शेख नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतली असल्याचीही बाब तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गिरीला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.  रिक्षाचे आयुर्मान सुमारे १६ वर्षे असून त्यानंतर या रिक्षा ठाणे प्रादेशिक कार्यालयाकडून बाद करण्यात येतात. तसेच या जुन्या रिक्षांचे परवाने नव्या रिक्षांवर चढविण्यात येतात.
जुन्या रिक्षांची नोंदणीही रद्द करण्यात येते. या रिक्षा पुन्हा वापरता येऊ नयेत, यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय त्याचे तुकडे करून त्या भंगारात जमा करतात. असे असतानाही ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जुन्या बाद केलेल्या रिक्षांवर बोगस नंबर टाकून त्या शहरात बिनधास्त तसेच खुलेआमपणे धावत असल्याचे ठाणे वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे. त्यामुळे ठाणेकरांचा अनधिकृत रिक्षांमधून जीवघेणा प्रवास सुरू असतानाही त्याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, जुन्या बाद रिक्षांचे नव्या रिक्षांवर परवाने चढविल्यानंतर त्यांचे तुकडे करून बाद करण्यात येतात. त्या रिक्षांची नोंदणी रद्द करण्यात येते, अशी माहिती ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली. तसेच बोगस नंबर टाकून जुन्या रिक्षांचा वापर होत असल्याप्रकरणी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे विशेष पथक अशा रिक्षांचा शोध घेतात आणि त्यांच्यावर कारवाई करते, असेही त्यांनी सांगितले.