हिंदीत महत्त्वाच्या भूमिका करणारे अनेक कलाकार सध्या मराठीत काम करताना दिसत आहेत. यात प्रामुख्याने जॅकी श्रॉफ, ऊर्मिला मातोंडकर, जॉनी लिव्हर, सोनू निगम, मनोज जोशी, आशुतोष राणा यांची नावे घेता येतील..
खूप वर्षांपूर्वी मराठीत आलेल्या एका चित्रपटाने लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड्स मोडले होते. या चित्रपटात हिरो होता लक्ष्मीकांत बेर्डे आणि हिरॉइन होती वर्षां उसगावकर! आता या जोडीने केलेल्या अनेक चित्रपटांची नावं मनात येतात. पण सगळ्यात पहिले आठवतो, ‘हमाल दे धमाल’ हा चित्रपट. या चित्रपटात हिंदीतल्या एका खूप मोठय़ा अभिनेत्याने अगदी चार-पाच मिनिटांचा ‘गेस्ट अपियरन्स’ दिला होता. तो कलाकारही या चित्रपटात त्याच्या मूळ नावानेच आला होता. तो कलाकार होता, अनिल कपूर! त्यानंतर अनेक वर्षे हिंदीतल्या कलाकारांनी मराठीत काम करण्याचा प्रसंग आला नाही. मात्र आता हिंदीतले अनेक बडे कलाकार आवर्जून मराठीत काम करत आहेत. यापैकी काही कलाकारांचे चित्रपट आधीच प्रदर्शित झाले आहेत, तर काही प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. याआधीच मराठी चित्रपट प्रदर्शित झालेल्यांमध्ये जॅकी श्रॉफ, ऊर्मिला मातोंडकर, जॉनी लिव्हर, सोनू निगम, सोनाली बेंद्रे यांची नावं ठळकपणे घेता येतील. या मंडळींनी मराठी चित्रपटांत एक तर त्यांच्या मूळ नावाने नाहीतर छोटीमोठी भूमिका केली आहे.
सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सुनील तावडे, सुप्रिया पिळगावकर वगैरे तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात एक सोडून दोन दोन हिंदी कलाकार दिसले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा गायक सोनू निगम याने स्वत:चीच एक छोटेखानी भूमिका केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याच्यावर त्यानेच गायलेलं ‘हिरवा निसर्ग हा भवतीने’ हे गाणेदेखील चित्रित झाले होते. त्यानंतर त्याच चित्रपटात एका नेपाळी गुरख्याच्या भूमिकेत जॉनी लिव्हरने हजेरी लावली. विशेष म्हणजे जॉनी लिव्हरनेही ‘रॅप’चा आविष्कार सादर करत ‘आमी कांचो’ हे गाणे आपल्या अंगविक्षेपासह गायले होते.
सध्याचे आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या पदरात यशाचं दान टाकणाऱ्या ‘अगंबाई अरेच्चा’ या चित्रपटात सोनाली बेंद्रे ‘चमचम’ करत नाचली होती. त्या वेळी सोनाली हिंदीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती आणि तिने प्रत्येक मोठय़ा अभिनेत्याबरोबर किमान एक तरी चित्रपट केला होता. ही गोष्ट लक्षात घेतली, तर त्या एका गाण्यातला तिचा नाचही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अनमोल होता. त्यानंतर अगदी अलीकडेच ‘हृदयनाथ’ नावाच्या चित्रपटात ऊर्मिला मातोंडकर या हिंदीतील एकेकाळच्या प्रमुख हिरॉइनने आयटम साँग सादर केले होते. हा चित्रपट चित्रपटगृहांत कधी आला आणि कधी गेला ते कोणालाही कळले नाही, ती गोष्ट वेगळी. ही झाली केवळ काही मिनिटांसाठी मराठी चित्रपटांत झळकून गेलेल्या हिंदीतील काही तारेतारकांची नावे. पण मराठीत संपूर्ण चित्रपटभर महत्त्वाची भूमिका केलेल्यांतही हिंदीतील काही मोठय़ा कलाकारांचा समावेश आहे. यात जॅकी श्रॉफचे नाव अग्रणी घ्यावे लागेल. जॅकीने आतापर्यंत १२ वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांत काम केले असून मराठीतील त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ‘उपकार दुधाचे’ या चित्रपटाद्वारे जॅकीने मराठी चित्रपटसृष्टीतली आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर त्याने ‘रीटा’ हा चित्रपट केला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची दखल समीक्षकांनीही घेतली. नुकत्याच आलेल्या ‘हृदयनाथ’ या चित्रपटातही जॅकी प्रमुख भूमिकेत होता. जॅकीचा कित्ता गिरवत आता मनोज जोशीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘दिनकर संभाजी चव्हाण’ या चित्रपटात मनोज जोशी एका सामान्य माणसाची भूमिका साकारत असून त्याच्यासह सयाजी शिंदेदेखील या चित्रपटात आहेत. या चित्रपटाची संकल्पना नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांची जुगलबंदी असलेल्या ‘ए वेनस्डे’ या चित्रपटाशी मिळतीजुळती आहे. मनोज जोशीने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असल्या तरी हा त्याचा पहिलाच मराठी चित्रपट असेल. आता या पंक्तीत आशुतोष राणा या गुणी अभिनेत्याचाही समावेश होणार आहे. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेतलेल्या आशुतोषने हिंदी, इंग्रजी, मल्याळम, तेलुगू, तमीळ अशा विविध भाषांमधील चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. सतत वैविध्यपूर्ण भूमिका करणाऱ्या आशुतोषने आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत असल्याचेही सिद्ध केले आहे. आता आशुतोष ‘येडा’ या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. हिंदीतले अभिनेते मराठीत येण्यामागे अनेक कारणे आहेत. जॅकी श्रॉफच्या मते दोन हिंदी चित्रपटांमध्ये प्रादेशिक भाषांमधील चित्रपट स्वीकारणे कधीही हितावह आहे. प्रादेशिक, विशेषत: मराठी भाषेत सध्या विविध प्रयोग होत आहेत. अनेक उत्तमोत्तम संकल्पना पुढे येत आहेत. एखाद्या अभिनेत्याचा कस लावणाऱ्या या संकल्पनांचा हिस्सा होणे आपल्याला आवडते, असे तो म्हणतो. मराठी कलाकार चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना वेळ देत नाहीत, ही तक्रार ‘येडा’, ‘स सासूचा’ या चित्रपटांचा दिग्दर्शक किशोर बेळेकर याने केली आहे. हिंदी अभिनेता चित्रपटाची प्रसिद्धी ही आपली जबाबदारी समजतो.  त्यामुळे लोकांशी प्रत्यक्ष संपर्क असलेल्या अनेक कार्यक्रमांना तो आवर्जून हजेरी लावतो. मात्र आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार केवळ ‘सुपाऱ्यां’मध्ये व्यग्र आहेत. ही अडचण लक्षात घेऊनही अनेक दिग्दर्शक हिंदी कलाकारांना पसंती देतात, असे त्याने स्पष्ट केले.     

सगळ्या भाषांत काम करायचंय..
माझा पहिला मराठी चित्रपट मला कसा मिळाला, हे माझे मलाच माहीत नाही. पण ‘उपकार दुधाचे’ केल्यावर मला मराठी प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळाले. ‘रीटा’मुळे तर मला स्वत:लाही खूप आनंद मिळाला. आता ‘हृदयनाथ’ करतानाही उत्तम अनुभव होता. पुढेही अनेक चित्रपटांसाठी मला विचारण्यात आले आहे. कदाचित पुढील महिनाभरात मी आणखी एक मराठी चित्रपट करत आहे, अशी बातमीही कळेल. पण केवळ मराठीच नाही, तर मी आतापर्यंत १२ भाषांतील चित्रपटांत कामे केली आहेत आणि मला सगळ्याच भाषांत काम करायचे आहे.
– जॅकी श्रॉफ, अभिनेता