ठाणे शहरातील राम गणेश गडकरी, घोडबंदर मार्गावरील डॉ. काशिनाथ घाणेकर आणि कळव्यातील नियोजित नाटय़गृहापाठोपाठ ठाणे महापालिकेने आता शहरात सिनेमागृह उभारण्याची योजना आखली असून अत्याधुनिक अशा ४-डी पद्धतीच्या सिनेमागृहाच्या उभारणीसाठी तब्बल सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर उभारण्यात आलेल्या वेगवेगळ्या मॉलमधील सिनेमागृहांचा धंदा फारसा तेजीत नसल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सातत्याने सुरू झाली. या ठिकाणी सुरू असलेल्या मल्टिप्लेक्समधील तिकिटांचे दर तरीही अवाच्या सव्वा असे असतात. त्यामुळे तुलनेने स्वस्त दरात सिनेमे बघण्याची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने वर्तकनगर परिसरातील एका उद्यानात ४० प्रेक्षकांच्या क्षमतेचे ४-डी सिनेमागृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावास आयुक्त असीम गुप्ता यांनी नुकतीच मंजुरी दिली असून हे सिनेमागृह नेमके कसे असावे, याविषयी आराखडे तयार केले जात आहेत.
सांस्कृतिक शहर अशी ठाणे शहराची वर्षांनुवर्षे ओळख आहे. मुंबई, नवी मुंबई परिसरातील नाटय़गृहांमधील नाटकांना येणाऱ्या रसिकांचा ओघ आटत चालल्याची ओरड एकीकडे सुरू असली तरी ठाण्यातील नाटय़गृहांमध्ये रसिकांचा नेहमीच मोठा प्रतिसाद असतो. ठाण्यातील नाटय़रसिक दर्दी आहेच, शिवाय कलाकृतींचा जाणकार आहे, अशी पावती मोठमोठय़ा नाटककारांनी यापूर्वी दिली आहे. हे लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने कळव्यात नव्या नाटय़गृहाच्या उभारणीविषयी प्रयत्न सुरू केले आहेत. ठाणे शहराच्या मधोमध असलेल्या गडकरी नाटय़गृहातील नाटय़प्रयोगांना रसिकांची मोठी गर्दी असते. त्या तुलनेत घोडबंदर मार्गावरील लोकपुरम भागात सुरू करण्यात आलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात खासगी कार्यक्रमांचे खेळ अधिक रंगतात, असे बोलले जाते. त्यामुळे कळव्यात नव्या नाटय़गृहाची खरोखरच गरज आहे का, असा सवाल सातत्याने उपस्थित केला जात आहे. मात्र, कळवा भागात एकही नाटय़गृह किंवा सिनेमागृह नसल्याने या ठिकाणी नाटय़गृह उभारणीचा प्रस्ताव अखेरच्या टप्प्यात आला आहे.
सिनेमागृहासाठी हालचाली सुरू
एकामागोमाग एक अशा नाटय़गृहांच्या उभारणीमुळे सांस्कृतिक क्षेत्रात ठाण्याची घोडदौड वेगाने सुरू असतानाच महापालिकेने आता सिनेमागृह उभाणीच्या क्षेत्रातही उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. वर्तकनगर परिसरात पद्मश्री अप्पासाहेब पवार नावाचे उद्यान असून या उद्यानात ‘बॉलीवूड पार्क’ या संकल्पनेनुसार थीम पार्क विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने पक्का केला आहे. सुमारे सहा हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या उद्यानात ४० प्रेक्षकांच्या क्षमतेचे सिनेमागृह उभारण्यात येणार असून त्यासाठी ४-डी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वानुसार या उद्यानाची उभारणी करण्यात येणार असून या ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी ५० रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. या सिनेमागृहासह ‘बॉलीवूड पार्क’च्या धर्तीवर या ठिकाणी नामांकित कलाकारांच्या पूर्णाकृती मूर्ती, मिनी ट्रेन, गाजलेल्या चित्रपटांचे पोस्टर्स असा सगळा लवाजमा असणार आहे. बॉलीवूडमधील गाजलेल्या चित्रपटांच्या, कलावंतांच्या कलाकृती पाहिल्यानंतर चित्रपट पाहण्याची संधी ४-डी सिनेमागृहामुळे ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे.

Story img Loader