पुस्तक प्रकाशन आणि विक्री व्यवसायात आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या केंद्र शासनाच्या ‘साहित्य अकादमी’तर्फे राष्ट्रीय पुस्तक सप्ताहाच्या निमित्ताने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात साहित्य अकादमीनेच प्रकाशित केलेली २४ भारतीय भाषांमधील हजारो पुस्तके मांडण्यात आली आहेत.
नेहरूजयंतीच्या निमित्ताने साहित्य अकादमीतर्फे दरवर्षी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय पुस्तक सप्ताह साजरा केला जातो. त्याचा एक भाग म्हणून साहित्य अकादमीतर्फे मुंबईत दादर (पूर्व) येथे साहित्य अकादमी सभागृह, तळमजला, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. साहित्य अकादमी ही संस्था पुस्तक प्रकाशनासह पुस्तक विक्रीही करते. तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकांच्या पुस्तकांबरोबरच अन्य विविध विषयांवरील पुस्तकेही साहित्य अकादमीतर्फे प्रकाशित केली जातात. ही संस्था केंद्र शासनाची असल्याने विविध भारतीय प्रादेशिक भाषांमधील पुस्तके प्रकाशित करणे तसेच काही गाजलेल्या पुस्तकांचा अन्य भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करणे हे कामही साहित्य अकादमीकडून केले जाते.यासंदर्भात साहित्य अकादमी-मुंबईच्या विक्री विभागाचे आनंद जोशी यांनी सांगितले की, प्रदर्शनात प्रामुख्याने साहित्य अकादमीने २४ भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित केलेली सुमारे तीन हजार पुस्तके मांडण्यात आली आहेत. यात कथा, कादंबरी, नाटक, कविता आदी साहित्य प्रकारातील पुस्तकांचा समावेश आहे.वेगवेगळ्या भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये लहान मुलांसाठी प्रकाशित केलेली काही पुस्तकेही प्रदर्शनात मांडण्यात आली असून अकादमीने प्रकाशित केलेल्या ‘अल्पचरित्र’मालिकेतील पुस्तकेही वाचकांना पाहायला मिळतील. यात संत तुकाराम, महात्मा ज्योतीबा फुले, अण्णाभाऊ साठे, उद्धव शेळके यांचा समावेश असल्याचे सांगून जोशी म्हणाले की, हे प्रदर्शन येत्या २० नोव्हेंबपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वासाठी खुले आहे.
प्रदर्शनात खरेदी केल्या जाणाऱ्या पुस्तकांवर २० ते ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. साहित्यप्रेमी आणि वाचकांनी या प्रदर्शनास मोठय़ा संख्येत भेट द्यावी, असे आवाहन साहित्य अकादमीने केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा