‘एहसान तेरा होगा मुझपर’, ‘मधुबन में राधिका नाचे रे’, ‘सुख के सब साथी दुख में ना कोई’, ‘दिल के झरोकें में’, ‘मेरे मेहबूब तुझे’, ‘चौदहवी का चाँद’, ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’, ‘खोया खोया चाँद’ यांसारखी असंख्य गाणी आपल्या मधाळ आवाजाने अवीट गोडीची करणारे गायक मोहम्मद रफी यांच्यावर त्यांच्याच सुनेने लिहिलेले इंग्रजीतील पुस्तक सोमवारी प्रकाशित केले जाणार आहे.
मोहम्मद रफी यांच्या निधनाला ३२ वर्षे उलटून गेली आहेत. तरी त्यांची गाणी आजही रसिकांच्या ओठावर रुंजी घालत आहेत. हिंदी सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर गाजलेले अभिनेते देव आनंद, गुरू दत्त, दिलीपकुमार, राजेंद्र कुमार आणि सगळ्यात महत्त्वाचा शम्मी कपूर यांनी रफीचा आवाज घेतला. शम्मी कपूरला चित्रपटात मिळालेली सगळी गाणी ही रफीच्या आवाजामुळे लोकप्रिय ठरली असे म्हटले तरी वावगे ठरू नये. आवाजाची मोठी ‘रेंज’ हे त्यांच्या आवाजाचे वैशिष्टय़ ठरले. त्यामुळेच रसिकश्रोत्यांमध्ये ते लोकप्रिय ठरले. हेच त्यांचे वैशिष्टय़ रफींची चाहती आणि सून यास्मिन रफी यांनी ‘मोहम्मद रफी माय अब्बा – ए मेमॉयर’ या इंग्रजी पुस्तकातून मांडले आहे. लहानपणापासून रफींचा मधाळ आवाज ऐकत मोठी झालेल्या यास्मिन रफी यांना रफी यांच्या पुत्राशी आपला विवाह होईल हे स्वप्नातही वाटले नव्हते. एक चाहती ते रफींची सून बनल्यानंतर मिळालेला त्यांचा सहवास, अनुभव या गोष्टी यास्मिन रफी यांनी पुस्तकात मांडल्या आहेत. बॉलीवूड ‘मेगास्टार’ अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सोमवारी ताज लॅण्ड्स एण्ड या हॉटेलमध्ये होणाऱ्या समारंभात पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे.
अतिशय नम्र स्वभाव, साधेपणा हे रफी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष, चवदार पदार्थ चाखण्याची त्यांना असलेली हौस, लहान मुलांबरोबर पतंग उडविण्याची त्यांची आवड, पोपटी रंगाची फियाट मुंबईच्या रस्त्यांवरून फिरविण्याचा त्यांचा छंद असो अशा अनेक गोष्टींबरोबरच शास्त्रीय गायनाबरोबरच देशभक्तीपर गाणी असोत की कव्वाली, गझल, भजने अशा विविध ढंगांत रफींनी गायलेली गाणी याविषयी सविस्तरपणे यास्मिन रफी यांनी लिहिले आहे.
हिंदी चित्रपटांतील रोमॅण्टिक गाणी आणि द्वंद्वगीते यावर मोहम्मद रफी यांनी उमटवलेली मोहोर ही रसिकांच्या मर्मबंधातली ठेवच आहे. या सगळ्याचा वेध यास्मिन रफी यांनी पुस्तकात घेतला आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा