* पुस्तक वाचण्याचा खोटा छंद बाळगण्यात तरुणाई अव्वल
* जोडीदारावर छाप पाडणे; मुलाखतीला जाताना पुस्तकांची मदत
* विमानतळाचे प्रतीक्षागृह हे पुस्तकवाचनासाठी लाडका कट्टा
पुस्तके वाचणे म्हणजे कित्येकांना अशक्यप्राय गोष्ट वाटते. त्यात कित्येक जण प्रवासादरम्यान पुस्तके सांभाळणे म्हणजे वाढीव वजन समजतात. त्यामुळे तरुण पिढी मात्र या पुस्तकांपासून शक्य तितकी दूर पळताना दिसते. पण आता हीच पुस्तके देशभरामध्ये लोकांना समोरच्यासमोर मिरविण्यासाठी आणि आपली छाप सोडण्यासाठी एक उत्तम साधन बनू लागली आहेत. नुकत्याच भारतातील सात विविध शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार तब्बल आपल्या संभाव्य जोडीदारावर आपली छाप सोडण्यासाठी २३ टक्के लोक पुस्तकांचा वापर करतात.
नुकतेच मुंबई, दिल्लीसह भारतातील सात विविध शहरांमध्ये ‘लॅण्डमार्क फेक्सपिअर सव्‍‌र्हे २०१४’ हे ऑनलाइन सर्वेक्षण घेण्यात आले होते. यामध्ये कोलकाता शहर अशा खोटय़ा पुस्तकवाचकांमध्ये अव्वल असून दिल्लीचा चौथा तर मुंबईचा पाचवा क्रमांक लागतो. याशिवाय प्रत्येक १० पैकी तीन जण समोरच्याला ‘आपण वेगवेगळी पुस्तके वाचली असल्याची’ थाप सहजच मारतात. अर्थात ‘पुस्तकवाचन’ मिरविण्यासाठी २८ टक्के लोक विमानतळाच्या प्रतीक्षागृहाला पसंती देतात, तर २६ टक्के लोकांना कॉफी हाऊसला पसंती देतात. लांबपल्ल्याचा ट्रेनचा किंवा बसचा प्रवास करणारा मुंबईकर या प्रवासादरम्यानमुद्धा फसव्या पुस्तकवाचनाचा शौक ठेवत असल्याचे समोर आले आहे. अर्थात यामध्ये पुरुषांचे प्रमाणे स्त्रियांपेक्षा जास्त असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले असून २४ टक्के पुरुष स्त्रियांवर छाप सोडण्यासाठी पुस्तकांची मदत घेत असल्याचे समोर चित्र आहे.
बसमध्ये प्रवास करताना, कॉलेज कट्टय़ावर गप्पा मारताना आपल्याला आवडणारी व्यक्ती कोठे भेटेल याचा काहीच नेम नसतो. त्यात तरुणांना कोणासमोर मिरविण्याची एकही संधी सोडायची नसते. त्यामुळे उंची कपडे, आकर्षक हेअरस्टाइल, रुबाबात वागणे असे विविध मार्ग अवलंबले जातात. पण आता तर या सर्वाच्या पलीकडे जाऊन आपल्या भावी जोडीदारावर आपल्या अभ्यासू वृत्तीची छाप सोडण्यासाठी पुस्तकांचा वापर तरुणांकडून सर्रास केला जाऊ लागला आहे. जोडीदाराव्यतिरिक्त नोकरीसाठी मुलाखतीला जाताना, ऑफिसच्या मीटिंगला जातानासुद्धा हातातले पुस्तक समोरच्यावर चांगले छाप सोडत असल्याचे तरुणांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जातानाही ते पुस्तक बाळगू लागले आहेत. कॉलेजमध्येही विविध स्पर्धादरम्यान परीक्षकांसमोर ही पुस्तके चांगलाच प्रभाव पाडतात. याच कारणांमुळे कित्येक जण त्यांच्या घरीसुद्धा विविध पुस्तकांनी सजलेले कपाट ठेवण्यास पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे पुस्तकांना ‘फॅशन अ‍ॅक्सेसरी’चे रुपडे मिळू लागले आहे. अर्थात यासाठी योग्य पुस्तकांची निवडही तितकीच गरजेची आहे. त्यामुळे छोटय़ा कादंबऱ्या किंवा प्रेमकथांची पुस्तके जवळ बाळगण्यापेक्षा अर्थशास्त्राची किंवा जुन्या इंग्रजी साहित्याची पुस्तके बाळगण्यास तरुण पसंती देत आहेत. आध्यात्मिक किंवा तात्त्विक विषयांची पुस्तके बाळगणाऱ्याला ‘जुन्या विचारां’चा समजले जाते. त्यामुळे मुंबईकरांमध्ये या विषयांची पुस्तके लोकप्रिय नाहीत, हेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा