पुस्तक विक्रीचा नवा फंडा
वाचक नाहीत म्हणून मराठी पुस्तके विकली जात नाहीत आणि पुस्तके विकली जात नाहीत कारण त्यांना वाचक नाही, या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी एक नवा फंडा ‘मॅजेस्टिक बुक हाऊस’च्या अनिल कोठावळे यांनी हाती घेतला आहे.
पुस्तकखरेदीसाठी वाचक दुकानात येत नाहीत म्हणून कोठावळे यांनी पुस्तके थेट वाचकांपर्यंत नेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी नरिमन पॉइंट, फोर्ट येथील विविध आस्थापनांच्या कार्यालयांची निवड केली आहे. त्यांच्या या उपक्रमाची सुरुवात मंगळवारी नरिमन पॉइंट येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयापासून झाली. कोठावळे यांनी अजब पब्लिकेशन-डिस्ट्रिब्युटर्सची ‘पन्नास रुपयांत घ्या कोणतेही पुस्तक’ ही योजना चक्क आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयाखाली पदपथावर टेबल्स टाकून राबविली आणि आपल्या कार्यालयाच्या थेट दारापर्यंत आलेल्या पुस्तक विक्रीच्या या उपक्रमास आयुर्विमा महामंडळ आणि नरिमन पॉइंट परिसरातील अन्य विविध कार्यालयातील साहित्यप्रेमी रसिकांनी  प्रचंड प्रतिसाद दिला. येथे बुधवारीही हा उपक्रम राबविण्यात आला.
भारतीय आयुर्विमा महामंडळ कार्यालयापाशी स्थानिय लोकाधिकार समितीच्या सहकार्याने राबविलेल्या या उपक्रमानंतर आता ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत फोर्ट येथील बॅक ऑफ इंडिया येथे तर त्यानंतर हार्निमल सर्कल येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियापाशी अशा प्रकारे पुस्तक विक्री केली जाणार असल्याची माहितीही कोठावळे यांनी दिली.
मराठी पुस्तकांना अजूनही मागणी आहे. काही ना काही कारणाने वाचक पुस्तकांच्या दुकानांपर्यंत येऊ शकत नसतील तर त्यांच्यापर्यंत थेट पुस्तके पोहोचविली तर त्याला मराठी वाचक मोठा प्रतिसाद देतात, हे यातून पाहायला मिळाल्याचे निरिक्षणही अनिल कोठावळे यांनी नोंदवले.

Story img Loader