अहेरी तालुक्यातील गुड्डीगुड्डम येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने प्रकल्प अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडून  पुरविण्यात आलेली पाठय़पुस्तके, वह्य़ा व अन्य साहित्य एका भंगार विक्रेत्याला परस्पर विकल्याचे चौकशीनंतर उघड झाल्याने मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
अहेरी तालुक्यातील आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर आलापल्लीवरून २० किमी. अंतरावर गुड्डीगुड्डम येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत निवासी मुले २३८, मुली २०४, अनिवासी मुले ३८ आणि २० मुली असे एकूण ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाल्यानंतर राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक यांच्याकडून चालू वर्षांतील जुलै ते ऑगस्ट महिन्यात शासकीय आश्रमशाळांमधील आदिवासी मुला-मुलींसाठी पाठय़पुस्तके, चित्रकला, आलेख व नोंद वह्य़ा तसेच स्टेशनरी आदी साहित्याचा पुरवठा करण्यात आला होता. हे सर्व साहित्य एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरी येथे पुरविण्यात आले. त्यानंतर प्रकल्प कार्यालयाने विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार हे साहित्य आश्रमशाळांना वितरित केले.
गुड्डीगुड्डम येथील शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक वरखढे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी न घेताच वरील साहित्य भंगार विक्रेत्याला विकल्याची बाब समोर आली आहे. ही बाब उघडकीस  आल्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक मडावी यांनी आश्रमशाळेची तपासणी करून वरिष्ठांनी अहवाल पाठविल्यानंतर मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्याध्यापक वरखडे यांनी पुस्तकांचे व वह्य़ांचे विद्यार्थ्यांना वितरण न करताच ते भंगारात विकले की काय? याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे एकात्मिक  आदिवासी विकास प्रकल्प, अहेरीचे प्रकल्प अधिकारी  उदय चौधरी यांनी  सांगितले.