राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय, चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब मैदानावर आयोजित ग्रंथोत्सवातील पुस्तक प्रदर्शनात सुमारे पाच लाख रुपयांच्या पुस्तक विक्रीची विक्रमी उलाढाल झाली असून पुस्तकप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. तीन दिवसीय या प्रदर्शनात २५ स्टॉल्स लावण्यात आले होते.
या तीन दिवसीय ग्रंथोत्सवातील स्टॉल्सना पुस्तकप्रेमींनी मोठय़ा प्रमाणात भेट देऊन खरेदी केली. विशेषत: महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी भेट देऊन स्पर्धा परीक्षेची पुस्तके विकत घेतली. या पुस्तकावर ५० टक्के सवलत देण्यात आली होती. इतरही स्टॉल्सवर १० ते ४० टक्के सवलतीच्या दरात पुस्तके विक्री करण्यात आली. पहिल्या दिवशी अंदाजे दिड लाख, दुसऱ्या दिवशी दिड लाख, तर समारोपाच्या दिवशी दोन लाख रुपयांचे ग्रंथ चंद्रपूरवासियांनी विकत घेतले. या विक्रीबद्दल स्टॉलधारकांनी समाधान व्यक्त केले असून चंद्रपूरकर ग्रंथप्रेमींचे आभार मानले. प्रदर्शनात तिन्ही दिवस पुस्तक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध पुस्तकांच्या स्टॉलवर विद्यार्थी व नागरिकांनी मोठय़ा संख्येने भेट देऊन पुस्तक प्रदर्शन व विक्रीचा लाभ घेतला. त्यात जिल्हा ग्रंथालय, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्यचे स्टॉल, चंद्रपूरं येथील राणाज पुस्तकालय, ज्ञानगंगा बुक्स, केसन्स बुक डोपो, नवनीत प्रकाशन, साईबाबा बुक सेलर, महालक्ष्मी बुक डोपो, लक्ष्य स्पर्धा परीक्षा केंद्र, साईन कट्टा प्रकाशन, तेजज्ञान फाऊंडेशन, ग्रंथाली, गुप्ताजी, सुधीर प्रकाशन, विद्याविकास, पंजाब बुक सेलर, मंगेश प्रकाशन, मध्यम इंटरप्रायजेस, अरिहंत बुक्स, लोकमाड्मय प्रकाशन यासह विविध स्टॉल्सचा समावेश होता.
जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी ग्रंथोत्सवातील सर्वच २५ स्टॉल्सना भेट देऊन विविध पुस्तकांची पाहणी केली. पुढील वर्षीही ग्रंथोत्सवाचे आयोजन करून अधिक पुस्तकांचे स्टॉल्स ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत वाघमारे यांनी व्यक्त केले. २३ मार्च रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एस.डहाळकर यांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ खरेदी केली. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण बडकेलवार, तहसीलदार गणेश शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, नायब तहसीलदार तळपदे उपस्थित होते.