जळगावकरांची वाचनाची भूक विनासायास, विनामोबदला भागविण्यासाठी येथील स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठान आणि नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ नुकताच येथे उत्साहात झाला.
येथील कांताई सभागृहात कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कवीवर्य ना.धो. महानोर, नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विनायक रानडे, निवृत्त बँक अधिकारी श्याम भुर्के (पुणे), भंवरलाल आणि कांताबाई जैन बहुउद्देशीय फाउंडेशनचे विश्वस्त दलूभाऊ जैन, प्रा. शरदच्चंद्र छापेकर, चांदोरकर प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी बोलताना ना.धो. महानोर यांनी, मराठी भाषा कधीही नष्ट होणार नाही, किंबहुना आम्ही ती होऊ देणार नाही अशी ग्वाही देऊन,या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. विनायक रानडे यांनी, जळगावकर वाचक सुजाण तर आहेतच, त्यांनी बालकांसाठीही असा उपक्रम सुरु करण्याचा आग्रह धरला असल्याचे सांगितले. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले.
दलूभाऊ जैन यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. भंवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन, नंदलाल गादिया, कपिल पाठक, गोकुळ चौधरी, यांचेही याप्रसंगी उपक्रमाला सक्रीय हातभार लावला म्हणून आभार मानण्यात आले.
याप्रसंगी श्याम भुर्के यांचा ‘आनंदाचे पासबुक’ हा विनोदी कार्यक्रम रसिकांना वेगळ्याच वातावरणात घेऊन गेला. आभार अरविंद देशपांडे यांनी मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा