‘ठेकेदारानेच पैसे दिलेल्यांची नावे सांगितली’
ठेकेदारानेच आपल्याला नगरसेवक, पदाधिकारी, अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचे सांगितले अशी माहिती देत नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी महापालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत खळबळ उडवून दिली. नाव सांगा, नाव सांगा, या अन्य नगरसेवकांकडून जोरात झालेल्या मागणीवर त्यांनी रसिक कोठारी असे नाव सांगून वर मी आयुक्तांनाही याची कल्पना दिली आहे असे त्यांनी सांगितले.
नगरोत्थान योजनेतून सुरू असलेल्या एलइडी दिव्यांच्या कामासंबधाने हा विषय उपस्थित झाला. सुमारे ९ कोटी रूपयांच्या या कामात शहरातील सर्व पथदिवे बदलून त्यात एलएडी हे नवे उर्जाबचत करणारे दिवे बसवायचे आहेत. हे काम त्याबाबत अनेकांनी अनेक तक्रारी केल्यामुळे बंद पडले आहे. चांगल्या दर्जाचे दिवे बसवलेले नाहीत याबरोबरच मनपाच्याच कर्मचाऱ्यांना त्यासाठी वापरून घेतले असल्याबाबत या तक्रारी आहेत.
विद्युत विभागाचे अधिकारी बाळासाहेब सावळे यांनी बोराटे तसेच किशोर डागवाले, पाऊलबुद्धे, वारे, पवार, संगीता खरमाळे व अन्य नगरसेवकांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. बोराटे यांनी हे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असून ठेकेदाराचे काम मनपाचेच कर्मचारी करत आहेत असा आरोप करत त्याचे पुरावेही आपल्याकडे आहे असे सांगितले. तशी छायाचित्रेही त्यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्यासह सभागृहाला दाखवली.
सावळे यांनी हे काम औरंगाबादच्या कंपनीने घेतले असल्याची माहिती दिली व त्याचबरोबर असे असले तरी हे काम नगरचेच ए. सी. कोठारी करत असल्याचेही त्यांनीच सांगितले. त्यामुळे सभागृहातील गोंधळ अधिकच वाढला. पुढे सावळे यांनी कामाची मुदत संपली आहे, त्याला काही दिवस झाले, मात्र अद्याप आयुक्तांना त्याची माहिती दिली नाही, तसेच ठेकेदाराला नोटीसही दिलेली नाही असे स्पष्ट केले. कामासंबधी तक्रारी आल्या, त्याची चौकशी सुरू आहे असे ते म्हणाले.
आयुक्त कुलकर्णी यांनी चर्चेत हस्तक्षेप करत तटस्थ कंपनीकडून दिव्यांची तपासणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र सार्वजनिक बांधकाम, सरकारी तंत्रनिकेतन, विखे महाविद्यालय या सर्वानी त्याला नकार दिला, आता पुण्यातील एका महाविद्यालयाकडून तपासणी करून घेण्याचा प्रयत्न आहे. या तपासणीचा अहवाल काय आहे त्यावर कारवाई करायची किंवा नाही हे अवलंबून असल्याचे स्पष्ट केले.
झालेल्या कामाचे काही बील अदा केले असले तरी तटस्थ यंत्रणेकडून कामाची तपासणी झाल्यानंतरच उर्वरित बील दिले जाईल असे ठेकेदार कंपनीला कळवले आहे. आताच काही कारवाई केली तर आपणच आपले नुकसान करून घेतल्यासारखे होईल, त्यामुळे काम होऊ द्या, अहवाल येऊ द्या, त्यानंतर पाहू असे आयुक्तांनी सांगितल्यानंतर यावर पडदा पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा