दोन वर्षांपूर्वी वादग्रस्त झाल्याने बासनात गुंडाळलेला, नगर शहराच्या मध्यवस्तीतील, लालटाकी भागातील प्रचंड किमतीचा महाकाय भूखंड, खासगी विकासकामार्फत बीओटी (बांधा, वापरा व हस्तांतरित करा) तत्वावर विकसित करण्याचा विषय जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी पुन्हा अजेंडय़ावर घेतला आहे. आजच्या सभेत कर्जत, जामखेड, पारनेर येथील जागा विकसित करण्याचा निर्णय घेताना, लालटाकीचा विषय मध्यवर्ती ठेवूनच चर्चा करण्यात आली. त्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी पुढील सभेत सादर करण्याची सूचना अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी केली.
सभेत कर्जतच्या मुलींच्या शाळेची जागा (४ हजार ८९० चौ. मी.), भांडेवाडी येथील विश्रामगृह व पशुदवाखान्याची जागा (२० हजार ८ चौ. मी.), पारनेरच्या विश्रामगृहाची जागा (१ हजार ४३२ चौ. मी.), तेथीलच नागेश्वर मंदिराजवळील भांडारगृहाची जागा (१ हजार  ८३८ चौ. मी.), जामखेडमधील विश्रामगृह व उर्दु शाळेची जागा (१ हजार १५० चौ. मी.) व जामखेडचे जि.प. निवासस्थानाची जागा ( २ हजार ३३ चौ. मी.) असे सहा प्रकल्प खासगी विकासकाच्या मदतीने विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे सादरीकरणही वास्तूविशारदांनी केले.
जागा विकसित करण्याच्या विषयात लालटाकीचा संदर्भ देत लंघे यांनीही काही निश्चित धोरण ठरवू, असे सांगितले. लालटाकीसाठी मागील कार्यकाळात प्रयत्नशील असलेले बाळासाहेब हराळ व सुनिल गडाख यांच्या मागणीवर लंघे यांनी पुढील सभेत लालटाकीच्या जागेचा विषय सादर करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला. हराळ मागील कार्यकाळात बांधकाम समितीचे सभापती असताना लालटाकीचा विषय वादग्रस्त झाला होता. त्यामुळे तत्कालीन अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी हा विषय गुंडाळण्याचा आदेश दिला होता. उत्पन्न वाढीसाठी बीओटी प्रकल्पास चालना देताना त्यासाठी सदस्यांची समिती स्थापन करण्याची सूचना राजेंद्र फाळके यांनी केली. कोणी काहीही म्हणत असले तरी लालटाकी व कर्जत, जामखेड, पारनेरच्या जागेचे प्रश्न वेगवेगळे असल्याने त्याचा एकत्रित विचार नको, आवश्यक असल्यास लालटाकीचा विषय पुन्हा ओपन करा, असेही त्यांनी स्पष्ट केले. मागील कार्यकाळात लालटाकीवरुन आपली अनावश्यक बदनामी झाली, आता कोणी काहीही म्हणोत, जागा विकल्याचा आरोप होत असला तरी ती विकसित करण्याचा निर्णय घ्या, अशीही मागणी हराळ यांनी केली. अण्णासाहेब शेलार यांनी लालटाकीच्या प्रस्तावावर पुढे काय झाले, पूर्वी त्याच्या प्रस्तावावर किती खर्च झाला, तेथील पाण्याच्या टाकीसाठी जि.प.ची जागा मनपाने ताब्यात घेतली त्यावर काय कार्यवाही झाली याचा खुलासा करण्याची, तसेच जि.प.च्या किती मोकळ्या जागांवर अतिक्रमणे झाली यासाठी विशेष सभा घेण्याची मागणी केली.
राहाता येथे विकसित केलेल्या जागेत मुख्याध्यापकासाठी बांधलेले निवासस्थान कोणीतरी बळकावले असल्याची तक्रार फाळके यांनी केली, मात्र शिक्षणाधिकारी त्यावर खुलासा करु शकले नाहीत. हराळ यांनी सभापती हर्षदा काकडे यांनीही मागील कार्यकाळात अभ्यास न करता विरोध केल्याचा आरोप केला, त्यावरुन भाजपचे गटनेते बाजीराव गवारे व हराळ यांच्यात खडाजंगी झाली. सुजित झावरे यांनी सदस्यांनी आपल्या तालुक्यापुरत्याच विषयावर बोलावे, असे वक्तव्य केल्याने काँग्रेस सदस्य संतापले, त्यावरुनही गदारोळ झाला. सभागृह जिल्ह्य़ासाठी आहे असे सांगत सदस्यांनी झावरे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.

Story img Loader