खारघरच्या टोलनाक्याला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांसाठी बाउन्सर रक्षकांचे कवच घेण्याची वेळ सरकारवर आली आहे. या बाउन्सरांचा पगार मानखुर्द ते कळंबोली सर्कल दहापदरी मार्गाचे काम करणाऱ्या विकासक कंपनीने केला आहे. टोलनाका सुरू करण्यापूर्वी येथे ५० बाउन्सर, ५० ऑपरेटर आणि ६० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून प्रत्यक्षात टोलवसुली सुरू केल्यावर ३०० बाउन्सरचे कवच घेण्याचा विचार विकासक कंपनीने केला आहे. पठाणी टोलवसुलीची पद्धत कंत्राटदाराने वापरल्याने हा टोल विधानसभा निवडणुकीनंतर सुरू होणार हे आता निश्चित झाले आहे.
खारघर येथील टोलनाका ऐन विधानसभा निवडणुका तीन महिन्यांवर आल्या असताना सुरू होत असल्याने येथील राजकीय पक्षांची आंदोलनांची स्पर्धा लागली आहे. जनतेच्या हितासाठी आमचा पक्ष कसा टोलला विरोध करतो हे दाखविण्यासाठी अनेक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निरनिराळ्या क्लृप्त्या लढविल्या आहेत. काहींनी बॅनर झळकवले तर काहींनी मोर्चाचे हत्यार उपसले तर सत्तारूढांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न नेला. या खटाटोपातून काहीही अद्याप साध्य झालेले नाही. मात्र रोज टोलनाक्याला होणारा विरोध पाहता या मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने कायदेशीर बांधणीप्रमाणे रस्त्यावर होणाऱ्या विरोधालाही दोन हात करण्याचा निश्चय केला आहे. प्रत्यक्षात या टोलनाक्याच्या उभारणीच्या कामाला अटकाव करणाऱ्यांसाठी कंत्राटदार कंपनीने साम, दाम, दंडाची भूमिका घेत स्वसंरक्षणासाठी बाउन्सर रक्षक व त्याहून बेताची परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णवाहिकेची सोय केली आहे. आपत्तीपूर्वी कंत्राटदार कंपनीने उचललेले पाऊल सावधगिरीचे असले तरीही ते येथील राजकीय पक्षांना या कंत्राटदार कंपनीने दिलेले एक आव्हान असल्याचे मानले जात आहे. खारघर येथील टोलनाक्यावरील वसुली ही याच बाउन्सर रक्षकांच्या मदतीने सुरू करणार हे यावरूनच स्पष्ट होते. टोलनाका उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच सुरक्षा रक्षकांना ९ हजार रुपये, टोलनाक्यावर ऑपरेटरचे काम करणाऱ्या तरुणांना १० हजार आणि बाउन्सर रक्षकाला १४ हजार रुपये आठ तासांचे वेतन कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. टोलनाका सुरू होण्यापूर्वीच सुमारे १५० जणांना यामध्ये आठ तासांची नोकरी मिळाली आहे. टोलनाक्याचे काम सरू असताना उन्हामध्ये काळ्या रंगाचे टीशर्ट घालून मोठय़ा शरीरयष्टीचे हे बाउन्सर तरुण येथे तैनातीला जुंपले आहेत. त्यामुळे टोलनाक्याच्या वसुलीपूर्वी हा टोलनाका अर्थकारणाचे केंद्रबिंदू बनला आहे.
या टोलनाक्यातून स्थानिक वाहनचालकांना सूट मिळावी म्हणून पहिल्यांदा शिवसेनेने गेल्या आठवडय़ात खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता विनोद तावडे यांनीही भारतीय जनता पार्टीच्या मोजक्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून येथील टोलनाक्याची पाहणी केली. दुपारी बारा वाजण्याच्या ठोक्यावर आलेले तावडे यांनी शंभर कार्यकर्त्यांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आणि लाल दिव्याच्या गाडीतून निघून गेले. तावडे यांच्या या पाहणी दौऱ्यातून काय साध्य झाले हे काही कार्यकर्त्यांनाच समजले नाही. विधान परिषदेत संसदीय पद्धतीने हा टोलनाका कसा अन्यायकारक आहे हे पटवून त्याविषयी सरकारदरबारात लढा देऊन वटहुकूम काढण्याऐवजी तावडे यांनी टोलनाका उभारण्यासाठी किती लोखंडी पाइप वापरलेत याची पाहणी केली हे सर्वानाच संभ्रमात टाकणारे आहे. परंतु मित्रपक्षाने केले म्हणून आपणही काहीतरी केले पाहिजे या उक्तीने ही क्रिया घडल्याचे वाहनचालक सांगतात. काही दिवसांनी या टोलनाक्याला विरोध करण्यासाठी काँग्रेससह शेकापसुद्धा रस्त्यावर उतरणार आहे. अखेर या टोलनाक्यावरून किमान स्थानिक वाहनचालकांना सूट मिळावी एवढी माफक व रास्त मागणी वाहनचालकांची आहे.

Story img Loader