शक्तिदेवी मूर्तीच्या मंडपात आरतीसाठी आलेल्या एका शालेय मुलाचा मंडपातील विद्युत तारेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. शक्तिदेवी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. शहरातील कर्णिक नगर भागात हा प्रकार घडला.
दीपक राजू वाघमारे (वय १३, रा. कर्णिक नगर) असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. घराजवळील दुर्गामाता नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्तिदेवी मूर्तीच्या मंडपात मृत दीपक वाघमारे हा अन्य भाविकांसह आरतीसाठी गेला होता. परंतु मंडपातील विद्युत तारेचा धक्का दीपक यास बसला आणि तारेतील विद्युत प्रवाहाचा संपर्क होऊन त्यात तो गंभीर भाजला. उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची एम.आय.डी.सी. पोलिसांनी चौकशी केली असता यात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचे दिसून आले. त्यानूसार मंडळाचे पदाधिकारी सागर जाधव, प्रीतम बोधले, उमेश पांढरे, दीपक व्हट्टे, मल्लेश बिराजदार, नदीम पीरजादे, दीपक गडगडे, सिध्दिलग पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एच. एन. खाडे हे करीत आहेत.
खुनाचा प्रयत्न
सोलापूर रेल्वे स्थानकासमोरील मुख्य टपाल कार्यालयाच्या संरक्षक िभतीलगत सोडा वॉटर विक्रीच्या गाडयांवर बेकायदेशीर दारूची विक्री केली जाते. रेल्वे पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर चालणाऱ्या या अवैध धंदयाकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी बियर पिण्यास ग्लास दिला नाही म्हणून एका तरूणावर खुनी हल्ला झाला. शिवा मल्लप्पा पंजलोर (रा. कोनापुरे चाळ, रेल्वे लाइन्स) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी धीरज चंद्रकांत उपासे (रा. सलगर वस्ती) व त्याच्या साथीदाराविरूध्द सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चौघांविरूध्द खंडणीचा गुन्हा
प्लॉट विक्री व्यवहारात मिळालेल्या सहा लाखापकी एक लाख खंडणीची मागणी करून शिवशंकर सूर्यकांत मेनकुदळे (वय 38 रा. अवंतीनगर, सोलापूर) यांना बेदम मारहाण करून खुनाची धमकी देणाऱ्या चौघा जणांविरूध्द फौजदार चावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजू हराळे, रवी मोरे, रोहित मोरे व िपटू देवकते अशी या गुन्हयातील आरोपींची नावे आहेत.