महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेवरील बहिष्कार कायम राहील, असे महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस डॉ. आर. बी. सिंह यांनी स्पष्ट केले.
महासंघाच्या कार्यकारिणी सभेत ठरलेल्या या भूमिकेबद्दल माहिती देताना डॉ. सिंह यांनी सांगितले की, महाविद्यालयीन प्रयोगशाळा व ग्रंथालय परिचरांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या पदोन्नती ग्रेड-पे संदर्भात राज्याच्या प्रभारी उच्च शिक्षण संचालकांनी संदर्भ पत्र क्रमांक उशिसं/२०१३ ग्रेड-पे मवि-१/११६ दि. २ मार्च २०१३ रोजी काढलेले परिपत्रक चुकीचे व दिशाभूल करणारे असून त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. यात परिचरांना त्यांनी केलेल्या शालान्त परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे. या परिपत्रकासही सभेत विरोध दर्शविण्यात आला. हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी करणारा ठराव या सभेत मंजूर झाल्याचे डॉ. सिंह यांनी नमूद केले.
या सभेस महाविद्यालयीन कर्मचारी महासंघाच्या सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष राजेंद्र गोटे, सरचिटणीस अजित संगवे, शशिकांत दुनाखे, माणिक लिगाडे, राजेंद्र गिड्डे, शब्बीर शेख आदी सदस्य उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा