तालुका गटविकास अधिकारी सुरेश कुलकर्णी यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध कुठलीच कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ तालुका पंचायत समितीच्या मासिक सभेवर उपसभापती किरण पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी बहिष्कार टाकला. या सभेला एकटय़ा सभापती सोनाली बोराटे उपस्थित होत्या.    
पंचायत समितीची मागची मासिक सभाही चांगलीच वादग्रस्त ठरली होती. सभापती व उपसभापतीसह नारायण नेटके, पंढरीनाथ गोरे, मोहिनी कोपनर, माधुरी लोंढे, कांताबाई नेटके, संगीता उदमले, द्वारकाबाई राऊत यांनी रोजागार हमीचा परत गेलेला ३ कोटी रुपयांचा निधी व विहिरींना कार्यारंभ आदेश न दिल्याने कुलकर्णी धारेवर धरले होते. त्याच बैठकीत कुलकर्णी यांना तात्काळ निलंबित करावे असा ठराव करून सभेचे कामकाज संवपण्यात आले होते. यांसदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्यांनी चार दिवसांत कारावाई करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र दुसरी बैठक आली तरी त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने सदस्यांनी या सभेवर बहिष्कार टाकला.
तत्पूर्वी सदस्यांनी याबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या. येथूनच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लंघे यांच्याशी संपर्क साधण्यात आला, मात्र आताही ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे उपसभापतींसह सर्व सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकला. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता असूनही कामे होत नसतील तर ही सत्ता हवी कशाला, असा सवाल या सदस्यांनी केला. तालुक्यातील काही अंतर्गत बदल्या विश्वासात न घेता केल्या अशी तक्रारही उपसभापती व सदस्यांनी या वेळी केली. या सर्व नाटय़ानंतर सभापती बोराटे सभागृहात जाऊन बसल्या, मात्र अन्य कोणीच सभेले गेले नाही. या प्रश्नाची तड लागेपर्यंत मासिक सभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही या वेळी जाहीर करण्यात आला.

Story img Loader