उरण तालुका जगाचे औद्योगिक केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. जीएनपीटी बंदर, ओएनजीसी यामुळे या परिसराला व्यावसायिकदृष्टय़ा मोठे महत्त्व आहे. यामुळे या ठिकाणी झपाटय़ाने औद्योगिकीकरण होत आहे. येथील रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या उग्र वायूमुळे नागरिकांना श्वसनाच्या आजारासह अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. हवेतील वाढत्या धूलिकण व रासायनिक पदार्थाच्या उग्र दर्पामुळे प्रदूषणात वाढ झाली असून या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीच कारवाई अथवा उपाययोजना केली जात नसल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्य़ातील सर्वात जास्त औद्योगिक कारखाने व प्रकल्प असलेला तालुका म्हणून उरण तालुक्याची सध्या ओळख आहे. या तालुक्यात मुंबईच्या समुद्रातील तेलविहिरीवर आधारित ओएनजीसीचा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. या प्रकल्पात ‘नाफ्त्या’सारख्या अतिज्वलनशील व उग्र दर्पाच्या रसायनांची साठवणूक केली जाते. ओएनजीसीच्या प्रकल्पातूनच दररोज अनावश्यक वायू जाळला जात असल्याने त्याच्या धुरामुळे उरण परिसरावर अनेकदा काळ्या ढगांचे साम्राज्य पसरलेले दिसते. मात्र या संदर्भात ओएनजीसी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील नागरिकांना धुरापासून कोणताही त्रास होणार नाही याची तजवीज केल्याची स्पष्टीकरणे दिलेली आहेत. तसेच धूर प्रदूषण मुक्त असल्याचेही सांगितले जाते. अनेकदा या परिसरात एलपीजी या घरगुती वापराच्या वायूचा मोठय़ा प्रमाणात दरवळ पसरण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरणही निर्माण होते. या संदर्भात वारंवार या परिसरातील ग्रामपंचायतीच्या वतीने तक्रारीही करण्यात आलेल्या आहेत. जेएनपीटी बंदरातूनही विविध प्रकारच्या रसायनांची बोटीतून आयात केली जाते. ही रसायने जेएनपीटी बंदराशेजारीच असलेल्या साठवणूक टाक्यात ठेवण्यात येतात. त्यामुळे या परिसरात रसायनांचा उग्रवास येतो, याचा परिणाम या परिसरात काम करणाऱ्या कामगार तसेच येथील नागरिकांवरही होत आहे. नुकताच धुतूम येथील तेलसाठा करणाऱ्या कंपनीतून ‘नाफ्ता’ या उग्र पदार्थाची गळती झाली होती. औद्योगिक कारणांमुळे वाहनांची वाहतूक वाढलेली आहे. वाहनातून बाहेर पडणारा कार्बन आणि रस्त्यावरील उडणारी धुळाचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. धूलिकणांमुळे अनेकांना फुफ्फुसाचे आजार जडू लागल्याने हवेतील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उपाययोजन करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. तसेच डम्पर व ट्रक मधून उघडय़ाने होणारी रेती, ग्रीड, विटा, माती यांच्या वाहतुकीमुळेही हवेतील प्रदूषणात वाढ होत असून वाहतूक विभागाच्या नियमानुसार अशा वस्तूची वाहतूक करताना वाहनांवर झाकण टाकणे आवश्यक असते. मात्र अशा वाहनांवर कारवाई होत नसल्यानेही प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे.-
बंदरावर येणाऱ्या जहाजांमधून सोडण्यात येणाऱ्या धुरामुळे काही प्रमाणात प्रदूषण होत आहे. मात्र या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपायोजनादेखील करण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून सातत्याने मॉनेटरिंग करण्यात येत असते.
किशोर केरळीकर, उरण विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ