शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही तासांच्या अंतराने केलेल्या कारवाईत दोन वेगवेगळ्या प्रकरणात लाच घेणाऱ्या दोघांना अटक केली. विक्रीकर अधिकारी राजकुमार सागरे व एकात्मिक बालविकास कार्यालयातील लेखाधिकारी शंकर बाचेवार यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
चिखलवाडी परिसरात राहणाऱ्या विकास नातू यांच्या पत्नीच्या नावे ‘बाफना टी पॉईंट’ येथे नंदीग्राम एजन्सीज नावाचे टायर-टय़ुब विक्रीचे दुकान आहे. दुकानातील प्रोफेशन टॅक्स व व्हॅट रिटर्न योग्य पद्धतीने ठेवला नाही, म्हणून विक्रीकर अधिकारी राजकुमार सागरे याने दोन हजार रुपये लाच मागितली. लाच घेत असताना त्यास कार्यालय परिसरात अटक झाली. अन्य दोन घटनांत देवदत्त देशपांडे यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या शासकीय आदिवासी वसतिगृहाला स्वत:च्या मालकीची जागा भाडय़ाने दिली. भाडय़ाचे सुमारे ५ लाख बिल काढण्यासाठी लेखाधिकारी शंकर बाचेवार याने २५ हजार रुपये मागणी केली. देशपांडे यांनी यापूर्वीच १० हजार रुपये दिले. पण आणखी १० हजार द्यावे लागतील, अशी मागणी केल्यानंतर देशपांडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. बाचेवार याला डॉक्टर लेन परिसरात १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दुपारी झालेल्या या दोन्ही प्रकरणांत वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा