कोणत्याही लोकप्रतिनिधीला त्यांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप चालत नाही हे सर्वज्ञात आहे. याच पाश्र्वभूमीवर कराड व पाटण तालुक्यातील आमदार मंडळींनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या होमपीचवरील विकासकामांना खो घालण्याचे तंत्र अवलंबले आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात होणारा सततचा ‘खो-खो’चा डाव पहाता राजकारण करताना, नेत्यांची मानसिकता किती संकुचित असते, याचा प्रत्यय वारंवार येत आहे. याचाच एक भाग म्हणून पाटणनजीकच्या संगमनगर धक्का पुलाच्या नेमक्या ठिकाणाच्या मुद्दय़ावरून वाहणारे ऐन पावसाळय़ातील वादाच्या पाण्यावरून दिसून येते.
खरेतर कोयना नदीवर उभारण्यात येणारा हा संगमनगर पूल नेमका कोठे उभारायचा याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देऊ केले आहेत. मात्र, याबाबत मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह सहकारी कार्यकर्त्यांवर विनाकारण खापर फोडले जात आहे. सध्याचा संगमनगर धक्का पूल दरवर्षीच्या पावसाळय़ात किमान आठ -पंधरा दिवस पाण्याखाली जाऊन सुमारे ३५ वाडय़ावस्त्यांमधील ग्रामस्थ संपर्कहीन होत असतात. या पाश्र्वभूमीवर पाटणच्या आजी, माजी आमदारांची या ठिकाणी उंचीच्या नव्या पुलाची मागणी आहे. दरम्यान, पाटण तालुक्याचे पुत्र पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्याने या मागणीला काँग्रेसमधूनही चांगलाच जोर चढला. आणि मुख्यमंत्र्यांनी लोकांची होणारी मोठी हेळसांड गांभीर्याने घेऊन येथील पुलासाठी सुमारे साडेबारा कोटींचा निधी देऊ केला आहे. यावर हा पूल जास्तीत जास्त लोकांच्या दळणवळणाचा मार्ग ठरावा व तो तांत्रिकदृष्टय़ाही योग्य असावा अशी भूमिका घेऊन हा पूल कोठे उभारायचा याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, पुलाचे श्रेय मुख्यमंत्र्यांच्या गटाला आणि विशेषत: त्यांचे पुतणे राहुल चव्हाण यांना जात असल्याने या विरोधात काही मंडळी जाणीवपूर्वक सतर्क झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून काही स्थानिक ग्रामस्थांना हाताशी धरून पुलाच्या नेमक्या जागेबाबत वादंग निर्माण करण्यात आल्याचे चित्र आहे. यासंदर्भात स्थानिकांकडून झालेल्या आंदोलनात मुख्यमंत्री व त्यांचे पुतणे राहुल चव्हाण यांना लक्ष्य करण्यात आले. विशेष म्हणजे पूल होण्यापूर्वी आणि याचा प्रत्यक्ष निधी जमा होण्यापूर्वीच हा साडेबारा कोटींचा निधी लाटल्याचा जावईशोध लावण्यात आला आहे. यावर नवा संगमनगर पूल कोठे उभारायचा हा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात असताना, चव्हाणांविरुध्द कोल्हेकुई का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, वरील आंदोलनाला छेद देणारी भूमिकाही समोर आली असून, या मंडळींनी संगमनगर पुलाच्या प्रश्नावरून दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करण्याचा तसेच दिशाभूल करण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसने रचला असून, त्याला येथील नेतृत्वाचाच छुपा पाठिंबा असल्याची टिका केली आहे. मात्र, परस्पर विरोधी टिका-टिपणीत जिल्हाधिकारी महोदयांचा साधा उल्लेखही नसून, त्यांच्या दरबारी आपल्या म्हणण्याचे साधे निवेदनही पोहोचले नसल्याचे समजते. आजवर मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक विधायक कामाला स्थानिक लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध राहिल्याचे दिसून येते. आपल्या मतदार संघातील हा हस्तक्षेपच असून, प्रत्येक कामाचे श्रेय केवळ आपल्यालाच मिळाले पाहिजे अशी संकुचित मनोवृत्ती यामागचे खरे कारण असल्याचे मुख्यमंत्री समर्थकांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा