मराठवाडय़ातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत, अशी विनंती नांदेडच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यापुढे उचलून धरली. जिल्हाध्यक्षांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना या विषयीचा निर्णय पक्षाचे प्रमुख नेते घेतील, असे ठाकरे यांनी सांगितले. चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी पक्षासाठी बरेच काही दिले आहे आणि पक्षात त्यांना उज्जवल भवितव्य आहे, असेही पत्रकार बैठकीत एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले.
पक्षसंघटन बांधणीसाठी विभागीय स्तरावरील बैठका घेण्याचे आदेश काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहेत. यापूर्वी अमरावती, ठाणे, नागपूर व अन्य विभागांतल्या बैठका पूर्ण झाल्या. सोमवारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या वेळी जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या बैठका व्हाव्यात, अशा सूचना करण्यात आल्या. नांदेड जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांनी या वेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना विश्वासात घेऊन मराठवाडय़ातील लोकसभेच्या उमेदवारीबाबतचे निर्णय घेतले जावेत, अशी विनंती केली. नांदेडचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मराठवाडा पोरका झाला आहे. त्यामुळे मराठवाडय़ातील सर्व निर्णय अशोकरावांना विश्वासात घेऊन केले जावेत, अशी मागणी केली. यावर ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले.
विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. २७) मुंबईत महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणूकविषयक कार्यक्रमाची चर्चा करतानाच पक्षाच्या वतीने उत्तराखंडातील आपत्तीसाठी निधीही देणार असल्याचे सांगण्यात आले. मराठवाडय़ाच्या वतीने साडेसात लाख रुपयांचा निधी ठाकरे यांच्याकडे या वेळी सुपूर्द करण्यात आला. एमआयएम व मोदी फॅक्टरचा काँग्रेसवर परिणाम होणार नसल्याचेही ठाकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा