ब्रिटिश कौन्सिलतर्फे  ‘ग्रेट ब्रिटन’ मोहिमेचा एक भाग म्हणून ‘ग्रेट शिष्यवृत्ती’ व ‘ग्रेट करिअर गाईड’ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी १० लाख पाऊंडांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीचा फायदा भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटनमधील सर्व विद्यापीठांमध्ये होऊ शकणार आहे.
भारतीय विद्यार्थ्यांची ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण व्हावी या उद्देशाने ही शिष्यवृत्ती योजना आखण्यात आली असून यामध्ये ३७० शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्लंड, स्कॉटलंड व उत्तर आर्यलड मधील २६० अभ्यासक्रमांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणे अधिक सोपे होणार आहे. जगातील सहा आघाडीच्या विद्यापीठांपैकी चार विद्यापीठे ब्रिटनमध्ये आहेत. उच्च शिक्षणाची ही दारे भारतीय विद्यार्थ्यांनाही खुली होण्यासाठी या शिष्यवृत्ती योजनेची मदत होईल, असा विश्वास ब्रिटिश उच्चायुक्तालयातील वाणिज्यदुत अँड्रय़ू सॉपर यांनी व्यक्त केला. ब्रिटनमध्ये उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक संधींबाबत एक मार्गदर्शक गाईडही सोमवारी मुंबईत प्रकाशित करण्यात आले.