पश्चिम भारतातील ब्रिटिश उपउच्चायुक्त पीटर बेकिंगहॅम यांच्या नेतृत्त्वाखालील ब्रिटनचे एक शिष्टमंडळ बुधवारी, १२ डिसेंबरला नागपूर भेटीवर येत आहे. भारत-ब्रिटन दरम्यान नागपूर शहरातील व्यावसायिक संधींची चाचपणी करण्याच्या उद्देशाने बेकिंगहम पहिल्यांदाच नागपूरला येत असून त्यांच्यासमवेत मुंबईतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या युके ट्रेड अँड इन्व्हस्टमेंट (युकेटीआय) वरिष्ठ व्यापार व गुंतवणूक सल्लागार तसेच लंडन स्कूल ऑफ ट्रेनिंग अँड इंटरनॅशनल बिझनेस वेल्सचे प्रतिनिधी राहणार आहेत.   
नागपूर भेटीदरम्यान पीटर बेकिंगहॅम नागपुरातील शासकीय अधिकारी, आघाडीवरील कंपन्या आणि व्यावसायिकांसमवेत नागपुरातील उद्योग क्षेत्राच्या गुंतवणुकीवर महत्त्वाची चर्चा करणार आहेत. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. पहिल्याच नागपूर भेटीसंदर्भात बेकिंगहॅम यांनी नागपूर शहराकडून मोठय़ा अपेक्षा व्यक्त केल्या असून नागपुरातील कंपन्या, शिक्षण संस्था तसेच ब्रिटन यांच्यात समन्वयाचे वातावरण निर्मा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. नागपुरातील गुंतवणूकदार कंपन्या, उद्योजक आणि शैक्षणिक संस्थांकडून ब्रिटनच्या कंपन्यांच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि उभयपक्षी भागिदारीचे नवे पैलू खुले होतील, असेही बेकिंगहॅम यांनी म्हटले आहे. पश्चिम भारत आणि ब्रिटन यांच्यात औद्योगिक संधी खुल्या करण्याला बेकिंगहॅम आणि युकेटीआय यांनी प्राधान्य दिले आहे. नागपूर भेटीत येथील कंपन्यांना विदेशी सहकार्य आणि भागिदारीची संधी चालून येणार असल्याने बेकिंगहॅम यांची नागपूर भेट विदर्भातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Story img Loader