महापालिका शाळांना लवकरच ‘ब्रॉडबॅण्ड’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी दिले आहे. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने चुंचाळे येथील महापालिका शाळा क्रमांक २८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या संगणक कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
महापौरांनी महिंद्रा कंपनीने दिलेल्या मदतीमागील उद्देश सफल करण्यासाठी सर्वानी मुलांना संगणक प्रशिक्षण देण्याची गरज व्यक्त केली. शाळेतील उपशिक्षक हेमंत पवार यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शाळेला १० संगणक संच महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीकडून उपलब्ध झाले आहेत. प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांनी ई-लर्निग सुविधा अधिक गतीमान करण्याची मागणी केली. उपायुक्त दत्तात्रय गोतिसे यांनी शिक्षण मंडळासाठी जास्तीत जास्त निधी दिला जाणार असल्याचे जाहीर केले.
नगरसेवक सचिन भोर यांनी शालेय प्रगतीचा आढावा घेतला. नगरसेवक नंदिनी जाधव यांनी शालेय पटसंख्या वाढत असताना वर्गसंख्या कमी पडल्याचे निदर्शनास आणून देत वरील मजल्याचे बांधकाम त्वरित सुरू करण्याबाबतच्या अडचणी दूर करण्याची मागणी महापौरांकडे केली.
याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे धनादेश विद्यार्थिनींना महापौरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
 प्रास्तविक मुख्याध्यापक अर्जुन राजभोज यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय सूर्यवंशी यांनी केले. स्वागत अविनाश कोठावदे यांनी तर, आभार अनिल सूळ यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा