एसएनडीएल कंपनीतर्फे नागरिकांना येणाऱ्या वाढीव वीज देयकांविरुद्ध खदखदणाऱ्या असंतोषाचा आज पुन्हा एकदा जबरदस्त स्फोट झाला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सिव्हील लाईनमधील कंपनीच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली. यावेळी मोठय़ा प्रमाणात कार्यालयातील सामानाची नासधूस केली. काही दिवसांपूर्वी शिवसेनेनेही वीज बिलाची होळी करून धुमसणारा संघर्ष चव्हाटय़ावर आणला होता.
मध्य आणि पूर्व नागपुरातील अनेक वस्त्यामध्ये घरोघरी महिन्याला सरासरी १५० ते २०० युनिट विजेचा वापर होत असताना एसएनडीएलतर्फे येणाऱ्या वीज देयकात ७०० ते ८०० युनिट दाखवून आठ ते दहा हजार रुपयांची देयके पाठविली जात आहे. या संदर्भात आमदार विकास कुंभारे यांनी एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा करून निवेदन दिली मात्र, त्यावर गेल्या दोन महिन्यापासून कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कुंभारे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांची दुपारी २ ची वेळ घेऊन ते चर्चा करण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह कार्यालयात गेले तर त्यावेळी  एकही अधिकारी उपस्थित नव्हता. यावेळी महापालिकेचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, सुधाकर कोहळे, भाजयुमोचे प्रमुख बंटी कुकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कंपनीचे वाणिज्य प्रमुख अजित गांगुली सध्या नागपूरबाहेर असल्याचे सांगण्यात आले तर देखरेख प्रमुख सोनल खुराणा थोडय़ावेळेत येत असल्याचे कंपनीतील कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, दहा मिनिटे झाली तरी एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित न झाल्याने कार्यकर्त्यांनी कंपनीच्या विरोधात घोषणा देत तोडफोड सुरू केली.

प्रारंभी कॉन्फरन्स हॉलमधील खुच्र्याची फेकाफेक करून एलसीडी आणि टीव्ही फोडून टाकला. सीसी टीव्ही कॅमेरे तोडण्यात आले. त्यानंतर स्वागत कक्षामधील खुच्र्याची फेकाफेक केली. अधिकाऱ्यांच्या खोल्यांमध्ये असलेले लॅपटॉप, संगणकाची तोडफोड केली. काचेची तावदाने तोडण्यात आली. ही तोडफोड सुरू असताना कंपनीतील कर्मचारी आतमध्ये होते. दरम्यान ही तोडफोड सुरू असताना कंपनीतील एका कर्मचाऱ्याने पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी येतपर्यंत सर्व आंदोलनकर्ते पसार झाले होते. तोडफोड झाल्यानंतर सोनल खुराणा कार्यालयात पोहचले मात्र तोपर्यंत सारे काही संपले होते.
आमदार विकास कुंभारे यांनी सांगितले, मध्य, पूर्व आणि दक्षिण नागपुरातील अनेक ग्राहकांना वाढीव देयके पाठविली जात आहेत. या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा केल्यानंतर कुठलाही तोडगा निघत नाही त्यामुळे आज पुन्हा चर्चा करण्यासाठी वेळ मागितला मात्र एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हता. ही तोडफोड म्हणजे नागरिकांचा असंतोष आहे. अनेकांच्या घरी कंपनीने नवीन मीटर बसविले असून ते मीटर वेगाने फिरणारे असल्याने त्त्याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, एकही अधिकारी ऐकायला तयार नाही. जुने मीटर चांगले असतानाही कंपनीने अनेकांच्या घरी बळजबरीने नवीन मीटर बसविले. अनेक नागरिकांवर कारण नसताना वीज चोरीचे आरोप लावले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे मात्र, ते ऐकून घेत नसतील तर ते सहन करणार नाही. जोपर्यंत नवीन मीटर बदलले जाणार नाही तो पर्यंत नागरिक वीज देयके भरणार नाहीत. शिवाय वीज देयकांच्या वसुलीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वस्त्यांमध्ये प्रवेश देणार नाही, असा इशारा कुंभारे यांनी दिला.
सोनल खुराणा यांनी सांगितले, आमदार विकास कुंभारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही तयार होतो. त्यांनी वेळ मागितली होती मात्र काही कामासाठी बाहेर गेल्यामुळे उशीर झाला. याचे निमित्त करून आंदोलन करणाऱ्या भाजयुमो कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. तोडफोड करून प्रश्न सुटणार नाही. घरोघरी लावण्यात आलेल्या नवीन मीटरमध्ये कुठलीही त्रुटी नाही. जेवढी वीज वापरली जात आहे तेवढे देयके पाठविली जात असल्याचे खुराणी यांनी सांगितले. भाजयुमोचे कार्यकर्ते येणार आहेत, याची कल्पना होती मात्र पोलिसांना याची माहिती देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader