एसएनडीएल कंपनीतर्फे नागरिकांना येणाऱ्या वाढीव वीज देयकांविरुद्ध खदखदणाऱ्या असंतोषाचा आज पुन्हा एकदा जबरदस्त स्फोट झाला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सिव्हील लाईनमधील कंपनीच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली. यावेळी मोठय़ा प्रमाणात कार्यालयातील सामानाची नासधूस केली. काही दिवसांपूर्वी शिवसेनेनेही वीज बिलाची होळी करून धुमसणारा संघर्ष चव्हाटय़ावर आणला होता.
मध्य आणि पूर्व नागपुरातील अनेक वस्त्यामध्ये घरोघरी महिन्याला सरासरी १५० ते २०० युनिट विजेचा वापर होत असताना एसएनडीएलतर्फे येणाऱ्या वीज देयकात ७०० ते ८०० युनिट दाखवून आठ ते दहा हजार रुपयांची देयके पाठविली जात आहे. या संदर्भात आमदार विकास कुंभारे यांनी एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा करून निवेदन दिली मात्र, त्यावर गेल्या दोन महिन्यापासून कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कुंभारे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांची दुपारी २ ची वेळ घेऊन ते चर्चा करण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह कार्यालयात गेले तर त्यावेळी एकही अधिकारी उपस्थित नव्हता. यावेळी महापालिकेचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, सुधाकर कोहळे, भाजयुमोचे प्रमुख बंटी कुकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कंपनीचे वाणिज्य प्रमुख अजित गांगुली सध्या नागपूरबाहेर असल्याचे सांगण्यात आले तर देखरेख प्रमुख सोनल खुराणा थोडय़ावेळेत येत असल्याचे कंपनीतील कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, दहा मिनिटे झाली तरी एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित न झाल्याने कार्यकर्त्यांनी कंपनीच्या विरोधात घोषणा देत तोडफोड सुरू केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा