मुंबई, ठाण्यात रस्त्यावर सभामंडप टाकणाऱ्या उत्सवी मंडळाच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात जनजागृती सुरू असताना नवी मुंबईत मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम व अटी मंडळांच्या गावी नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गणेशोत्सव, दहीहंडीची तयारी करणाऱ्या मंडळांनी बिनधास्तपणे रस्त्यात सभामंडप थाटले आहेत. मंडळाच्या या अतिक्रमणाकडे पालिका आणि पोलिसांनी कानाडोळा केल्याचे चित्र असून प्रसिद्धीपत्रक काढून या दोन यंत्रणांनी हात झटकल्याचे दिसून येते आहे.नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांविषयी मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे नवी मुंबईत अनेक अनधिकृत बाबी बिनदिक्कतपणे घडत असून पालिका प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधल्याचे दिसून येते. गणेशोत्सव करणाऱ्या सार्वजनिक मंडळाने रस्त्यावर मंडप न टाकता ७० टक्के भाग वाहनांसाठी खुला ठेवण्याचे आदेश दिले आहेत, मात्र हा नियम नवी मुंबईत धाब्यावर मारला जात असल्याचे दिसून आले. ऐरोली सेक्टर आठमध्ये बाल गोपाल मित्रमंडळाने तर चक्क सर्व रस्त्या अडवून मंडप घालण्याचे काम सुरू  केले आहे. तळवली नाक्यावर एका मंडळाने घातलेल्या कमानी आणि त्यासाठी खोदलेले रस्ते पालिकेच्या अधिकाऱ्यांना कधी दिसले नाहीत असे चित्र आहे. वाशी सेक्टर १७ येथील सार्वजनिक गणेशोत्सवाने रस्तावर आपल्या मंडळाचा सातबारा लिहिला असल्यागत मंडप टाकण्याचे काम सुरू केले आहे.तुर्भे स्टोअर येथे नवयुवक मित्र मंडळाने रस्त्याच्या कडेला मंडप गतवर्षीपेक्षा खेटून टाकला आहे, पण ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक संख्या लक्षात घेता या मंडपामुळे आता दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पण हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांना हा मंडप दिसत नाही. गणेशोत्सवाला आणखी वीस दिवस असल्याने सर्वच मंडळानी मंडप टाकण्यास सुरुवात केलेली नाही, पण या मोठय़ा मंडळांनी दुसऱ्या मंडळांना आदर्श घालून दिला आहे. पालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस व पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मंडप आणि डीजेबद्दल आचारसंहिता स्पष्ट केली. त्याचे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले, पण अशा प्रकारे नियम तोडणाऱ्या एकाही मंडळावर कारवाई केल्याची नोंद नाही.