उसाचा दर जाहीर करण्यापूर्वीच साखर कारखाने चालू करण्याचे प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावले. सोनहिरा, केन अॅग्रो, हुतात्मा, क्रांती या कारखान्याच्या ऊस तोडी बंद पाडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस आंदोलनाला तोंड फोडले. चिंचणी या ठिकाणी सोनहिरा साखर कारखाना समर्थक व संघटनेचे कार्यकत्रे यांच्यात वादावादीचा प्रसंग गुरुवारी उद्भवला. संघटनेने साखर कारखानदार आततायी भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम आणि क्रेन अॅग्रोचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या पुतळ्याचे दहन केले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ५० हून अधिक ऊस वाहतूक करणाऱ्या बलगाडय़ांचे टायर फोडून वाहतूक रोखली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी ऊस दर प्रश्नी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दि. २४ नोव्हेंबपर्यंत निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या विनंतीनुसार त्यांनी तोपर्यंत आपले आंदोलन स्थगित ठेवले होते. मात्र, सांगली जिल्ह्यातील पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम व ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या मतदार संघातील हुतात्मा, क्रांती, केन अॅग्रो, सोनहिरा या कारखान्यांनी हंगाम सुरु करण्याचा प्रयत्न कालपासून सुरु केला. कारखाना समर्थक असणाऱ्या सभासदांच्या शेतातील ऊस तोड सुरु झाल्याने संघटनेचे कार्यकत्रे व समर्थक यांच्यामध्ये कालपासून संघर्ष धुमसण्यास सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांनी काल २० पेक्षा जादा बलगाडय़ांचे टायर फोडून ऊस वाहतूक रोखली होती. पुन्हा आज ऊस वाहतूक सुरु करण्यात येत असल्याचे लक्षात येताच वांगी, चिंचणी या गावच्या परिसरात ऊस वाहूतक करणाऱ्या ५० बलगाडय़ांचे टायर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चिंचणी, वांगी, अंबप फाटा या ठिकाणी वाहने अडवून वाहतूक रोखली. या वेळी डॉ. पतंगराव कदम यांच्या सोनहिरा कारखाना समर्थकांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर वाहतूक रोखू नये, यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र उभय गट समोरासमोर आल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करुन अनर्थ टाळला.
संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याची कार्यकर्त्यांची तयारी आहे. मात्र, सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे कत्रेधत्रे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पुढे आणून कार्यकर्त्यांवर अरेरावी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ऊस दराबाबत सबुरीचे धोरण स्वीकारण्याचे आवाहन केले असल्यामुळे शासनाला सहकार्याची भूमिका आहे. प्रशासनानेही ऊस दराचा प्रश्न मिटेपर्यंत शांततेचे आवाहन केले असल्याने कारखानदारांनी कारखाने सुरु करण्याबाबत निर्णयापर्यंत प्रतीक्षा करायला हवी. मात्र सत्तेच्या जोरावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न कदापि यशस्वी होऊ दिला जाणार नाही.
ऊस दराचा प्रश्न निकाली निघेपर्यंत कारखाने सुरु करु दिले जाणार नाहीत. शासनाची भूमिका अद्याप स्पष्ट नसताना सोनहिरा व केन अॅग्रो हे कारखाने सुरु करण्याचा प्रयत्न म्हणजे संघटनेला खिजविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करुन संघटनेच्या वतीने या कृतीचा निषेध करण्यासाठी गुरुवारी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा