सरकारी दलाल असल्याचे सांगून एका डॉक्टरला ३० लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या जमीन विक्री दलालाला पोलिसांनी अटक केली. चांगली जागा मिळवून देतो, असे सांगून अनीस हुसेन अवनलकर याने एका डॉक्टरकडून ३० लाख ३४ हजार रुपये उकळून त्याची फसवणूक केली. विशेष म्हणजे याआधीही अनीस अवनलकर याला दोन वेळा फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्या वेळी त्याने दीड कोटी रुपयांची फसवणूक केली होती.
फसवणूक झालेले डॉ. शौनक ठकार हे दंतवैद्य असून विलेपार्ले येथे राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांची अवनलकरशी ओळख झाली. डॉ. ठकार यांच्या अत्यंत जवळच्या माणसांची ओळख देत अवनलकर याने त्यांचा विश्वास संपादन केला. आपण जमीन विक्री व्यवसायातील सरकारी दलाल आहोत, असेही त्याने भासवले. त्यासाठी अवनलकर याने खोटे ओळखपत्रही तयार केले होते.
त्यानंतर २०१०मध्येच अवनलकर याने अंधेरी येथील डी. एन. नगरमधील रहेजा क्लासिक्समध्ये स्वस्तात जागा मिळवून देतो, असे डॉ. ठकार यांना सांगितले. डॉ. ठकार यांनीही ३० लाख ३४ हजार रुपये अवनलकर याला दिले. अवनलकर याने ठकार यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना खोटी पावतीही दिली. मात्र या घटनेला दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही अवनलकरने डॉ. ठकार यांना जागा न दिल्याने अखेर डॉ. ठकार यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी अधिक तपास करत रविवारी अवनलकर याला अटक केली. सोमवारी त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले असता त्याला १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात यावे, असे सुनावण्यात आले. अवनलकर याला याआधी २००२मध्ये जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि २०११ मध्ये डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक करण्यात आली होती.

Story img Loader