कर्नाटकात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले व मुलींच्या संघांनी तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझपदक जिंकले. महाराष्ट्राची कर्णधार मयूरी मुत्याल हिला स्पर्धेतील उत्कृष्ट आक्रमणाचे पारितोषिक मिळाले. नगरच्या अन्य चार खेळाडूंनीही या स्पर्धेत ब्राँझपदके मिळवली.
कर्नाटकातील तुमकूर येते नुकत्याच या स्पर्धा झाल्या. मुलींची महाराष्ट्राची कर्णधार मुत्याल हिच्यासह नगरच्या चौघांचा स्पर्धेत समावेश होता. मयूरीने स्पर्धेत एकूण १६ गडी बाद करून सर्वोत्कृष्ट आक्रमणाचे पारितोषिक जिंकले. मुलांच्या संघाने नवोदय विद्यालय संघाचा पराभव करून तिसरा क्रमांक मिळवला. राज्य संघाच्या विजयात नगरचा संकल्प थोरात, शेवगावचा वेदान्त शेंडगे व ओंकार वावरे यांचा सिंहाचा वाटा आहे. तेही ब्राँझपदकाचे मानकरी ठरले. मयूरी व संकल्प हे दोघेही नगरच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे विद्यार्थी आहेत. निर्मलनगरमधील (सावेडी) एकलव्य क्रीडा मंडळाचे ते खेळाडू आहेत. वेदान्त व ओंकार हे दोघे शेवगाव स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू आहेत.
मयूरीचे हे राष्ट्रीय पातळीवरील चौथे, तर संकल्पचे दुसरे पदक आहे. या विजेत्या खेळाडूंचे संध्या कुलकर्णी, ज्योती थोरात, खो-खो संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पितळे, जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले, राज्य मार्गदर्शक अजय पवार, सुधीर चपळगावकर, डॉ. शंकर शेळके, पोपट लोंढे आदींनी अभिनंदन केले.

Story img Loader