नाले आणि नद्यांच्या सफाईचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.  सखल भाग जलमय होऊ नयेत यासाठी महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र भौगोलिक स्थिती, समुद्रकिनाऱ्यांवर टाकण्यात आलेला भराव व अन्य कारणांमुळे मुंबईतील नाले तुंबणारच आणि त्याचा फटका मुंबईकरांना बसणारच, असे दस्तुरखुद्द पालिका अधिकाऱ्यांचेच म्हणणे आहे. नदी व नाल्यांच्या काठांवर राहणारे झोपडवासी या नदीनाल्यांतच कचरा टाकतात आणि भरतीच्या वेळी तोच पुन्हा येऊन मुखाशी साचतो. मुंबईत पाणी साठण्याचे हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुंबईची भौगोलिक स्थिती विचित्र आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात सखल भाग जलमय होतात. सखलभागात साचलेल्या पाण्याचा निचरा लवकर व्हावा यासाठी महापालिकेने अनेक ठिकाणी पंप बसविले आहेत. मात्र उधाणाच्या वेळी समुद्राच्या लाटांबरोबर कचरा किनाऱ्यावर फेकला जातो. तसेच समुद्राचे नाल्यांमध्ये शिरते. फिल्टरपाडय़ाजवळ उगम पावणारी मिठी नदी वांद्रे येथे समुद्रात मिळते. पण उधाणाच्या वेळी मिठी नदीत क्रांतीनगपर्यंत समुद्राचे पाणी शिरते. समुद्राच्या पाण्यासोबत मोठय़ा प्रमाणावर कचरा नदीमध्ये येतो. मात्र ओहटीनंतर कचरा नाले आणि नद्यांमध्येच राहतो. परिणामी नाले आणि नद्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि सखल भाग जलमय होऊन मुंबईकरांना फटका बसतो, असे पालिकेचे अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प संचालक  लक्ष्मण व्हटकर यांचे म्हणणे आहे.
मुंबईतील नाले आणि नद्यांच्या किनाऱ्यावर झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. झोपडपट्टीवासी नद्या आणि नाल्यांचा डंपिंग ग्राऊंडसारखा वापर करतात. नदी-नाल्यांमध्ये दररोज मोठय़ा प्रमाणावर कचरा टाकला जातो. पालिकेने नदी-नाल्यांची सफाई करते. परंतु झोपडपट्टीवासी नाल्यांमध्ये कचरा टाकतच राहतात. त्यामुळे नाले पुन्हा कचऱ्याने भरतात. आणि पावसाळ्यात नाले तुंबल्यानंतर हेच झोपडपट्टीवासी महापालिकेला दोषी ठरवतात, असे व्हटकर उद्वेगाने म्हणाले.

Story img Loader