निरगुडकर भावंडांनी लिहिलेल्या ‘मंदार आणि मंजिरीच्या कविता’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये पाडगावकर यांच्या हस्ते झाले. संगीतकार कौशल इनामदार, ‘वीणाज् वर्ल्ड’च्या वीणा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मंजिरी आणि मंदार निरगुडकर या बहीण-भावांनी लिहिलेल्या कवितांमध्ये निरागस मनाचे प्रतिबिंब आणि शब्दांची साधी वीण दिसून येते, कविता नकळत मनात फुलून येते. ज्या कारणाने कळीचे फुल होते त्याच कारणाने मनातल्या शब्दांच्या कळ्या कवितेची फुले होतात. मंदार आणि मंजिरी यांच्या कविता अशाच फुलून आल्या आहेत, अशी कौतुकाची थाप मंगेश पाडगावकर यांनी भावंडांच्या पाठीवर मारली. या काव्य संग्रहातील काही निवडक कविताही त्यांनी सादर केल्या. कौशल इनामदार यांनी या काव्यसंग्रहातील ‘शब्द’ या कवितेला चाल लावून ती सादर केली. तर मंजिरीच्या कविता मनाला भावतात, अशी दाद वीणा पाटील यांनी दिली.
प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने समीरा गुजर-जोशी यांनी मंदार व मंजिरी यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी या दोघांचे आई-वडील डॉ. चारुशीला आणि सुधीर निरगुडकर, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील, हेमंत नगराळे, उद्योजक सुभाष दांडेकर, केसरी पाटील, अभिनेते प्रदीप वेलणकर, सुबोध भावे, अभिनेत्री फैय्याज आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा