दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेतही बीएसएनएलमधील कर्मचारी कर्तव्य व सचोटीच्या जोरावर कंपनीस पुढे नेत आहेत, असा गौरव खासदार दिलीप गांधी यांनी केला. बीएसएनएलमधील ‘नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉईज’ या कर्मचारी संघटनेच्या पाचव्या विभागीय अधिवेशनात स्वागताध्यक्षपदावरून गांधी बोलत होते.
दूरसंचारचे जाळे ग्रामीण भागात व छोटय़ा गावांपर्यंत पोहोचले आहे, संवाद माध्यम ही सध्याच्या काळातील गरजेची गोष्ट झाली आहे. या प्रकारच्या अधिवेशनामुळे प्रशासन व कर्मचारी संघटना यांच्यात सुसंवाद निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा गांधी यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे उद्घाटक दूरसंचारचे नगरचे अजातशत्रू सोमानी यांनी बदलत्या तंत्रज्ञानामुळे संवादाची विविध साधने व त्याची सखोल माहिती कर्मचा-यांनी ग्राहकांपर्यंत न्यावी, असे आवाहन केले. कर्मचा-यांनी कर्तव्य भावनेतून पुढे जाताना प्रत्येक बदलाची सुरुवात स्वत:पासून करावी, असेही आवाहन त्यांनी केले. प्रमुख पाहुणे, संघटनेचे सचिव के. एस. कुलकर्णी (नवी दिल्ली) यांनी कंपनीतील कर्मचा-यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष वेधले. विभागीय अध्यक्ष बी. एन. पाटील, सचिव रमेश आमरे, मुख्य लेखाधिकारी एस. एम. थोरात, राज्य सहसचिव व्ही. बी. कोकाटे आदींची भाषणे झाली.
जिल्हा सचिव अशोक हिंगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अधिवेशनासाठी मळुजी गाडळकर, भाऊसाहेब खाकाळ, सुनील धर्माधिकारी आदींनी परिश्रम घेतले. बाळासाहेब देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. एस. हंपे यांनी आभार मानले.
फोटो ओळी-
नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉईज संघटनेच्या नगरमधील पाचव्या विभागीय अधिवेशनाचे उद्घाटन खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी अजातशत्रू सोमानी, के. एस. कुलकर्णी, बी. एन. पाटील, आर. एन. आहिरे, एस. एस. थोरात आदी उपस्थित होते. (छाया- महेश इंगळे, नगर)

Story img Loader