महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्यासह सर्व महामानवांच्या स्वप्नपूर्तीसाठी पक्ष पुढाकार असल्याची ग्वाही बसपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार वीरसिंग यांनी येथे दिली.
येथील डॉ. आंबेडकर मैदानात सोमवारी आयोजित महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष कृष्णा बेले, प्रदेश सचिव संदीप ताजणे, जिल्हाध्यक्ष अविनाश वानखेडे उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शासनकर्ती जमात बनण्यासाठी समाजाला तयार करणे हे प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्त्यांचे लक्ष्य असले पाहिजे.
महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या धर्तीवर विधानसभेवर निळा झेंडा फडकावण्याचे बहुजन समाज पक्षाचे लक्ष्य असून त्या आधी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने कामाला लागावे, असे मत प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी व्यक्त केले. बसपचे उपाध्यक्ष कृष्णा बेले यांनी, ओबीसी समाज बसपबरोबर जुळत असल्याचे सांगून जिल्ह्य़ातील सर्व समाजाला पक्षात सहभागी होण्याचे आवाहन केले.
प्रदेश सचिव संदीप ताजने यांनी आंबेडकरी अनुयायांनी कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नये. बसपने उत्तर प्रदेशात बहुजनांसाठी नवी क्रांती केली आहे. महाराष्ट्रातही ‘ही’ क्रांती करावयाची आहे. यासाठी बसपच्या कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे, असे आवाहन यावेळी केले. जिल्हाध्यक्ष अविनाश वानखेडे, रवींद्र मुंदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रताप कांबळे यांनी, तर आभार राहुल गवई यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्ह्य़ातील बसपचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा