गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत बसपकडे उमेदवार चालून आले असले तरी यावेळी लोकसभेचे तिकीट खरेदी करण्यास कुणी तयार नसल्याने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कुणाला द्यायची, यावरून बसपच्या नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे बसपला आता वेळेवर उमेदवारांची शोधाशोध करावी लागत आहे.
मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने २००० साली महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली. १९९९ च्या निवडणुकीत राज्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघात बसपच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली. त्यामुळे राज्यात बसपचे प्रस्त वाढेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता, परंतु १६ व्या लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघात तिकीट खरेदी करण्यास इच्छूक उमेदवार मिळत नसल्याने बसपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना अन्य पक्षातील नाराजांच्या दरवाजावर दस्तक द्यावी लागत आहे. या मतदारसंघात २००४ मध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य बसपाचे उमेदवार होते. तेव्हा त्यांनी १ लाख ५ हजार मते घेतली होती. वैद्य यांनी घेतलेली लाखावर मतेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पराभवास कारणीभूत ठरली होती, तर २००९ मध्ये अॅड. दत्ता हजारे बसपचे उमेदवार होते. हजारे यांनी ६० हजारावर मते घेतल्याने मतविभाजनाचा फटका पुगलिया यांनाच सहन करावा लागला होता.
बसपचा उमेदवार हा कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारासाठी नेहमीच घातक ठरलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात बसप उमेदवाराकडे नेहमीच लक्ष राहते. त्याला कारण या मतदारसंघात बसपाचे कॅडर मतदार मोठय़ा संख्येने आहे. चंद्रपूर, भद्रावती, मूल, राजूरा व बल्लारपूर या शहरात बसपने चांगला जम बसवला आहे, परंतु यावेळेस बसपला उमेदवार मिळत नसल्याने मोठी पंचाईत झालेली आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली तेव्हापासूनच बसपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केली. यातूनच काही दिवसांपूर्वी बसपच्या नेत्यांनी राजेंद्र वैद्य यांच्याशी संपर्क साधला होता, परंतु बसपची संस्कृती बघून आहे तेथेच सुखी असल्याचे सांगत वैद्य यांनी स्पष्ट नकार दिला. भाजपच्या प्रदेश सरचिटणीस शोभा फडणवीस यांच्याशी सुध्दा बसप नेते संपर्कात होते, परंतु त्यांनी सुध्दा लोकसभेचे तिकीट खरेदी करायचे नाही, असे म्हणून स्पष्ट नकार कळविला.
तिकडे काँग्रेस नगरसेवक करीमलाला काझी यांच्याशी सुध्दा बसप नेत्यांनी संपर्क साधला आहे, परंतु लाला यांनी अजूनही स्पष्ट काही कळविलेले नाही. तिकडे जावेद पाशा यांच्या संपर्कात सुध्दा बसपचे स्थानिक व प्रदेश पातळीवरील नेते आहेत. लाला व पाशा यांनी लढण्याची तयारी दाखविली असली तरी निवडणूक खर्चाच्या मुद्यावर या दोघांनी माघार घेतली असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणूक लढायची म्हटले तर किमान दोन ते तीन कोटीचा खर्च अपेक्षित आहे. बसपकडून उमेदवाराला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत केली जात नाही. त्यामुळे इतका पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत आता बसपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष हंसराज कुंभारे यांनाच निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बसपच्या कोअर समितीचे सदस्य हंसराज गजभिये यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. दरम्यान, कुंभारे यांची उमेदवारी निश्चित झाली असली तरी येत्या २२ मार्चपर्यंत एखादा उमेदवार तयार झाला तर त्याचा सुध्दा विचार करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असतांना बसपच्या पदाधिकाऱ्यांकडून उमेदवाराची शोधाशोध सुरूच आहे.