निवडणूक आली की बहुजन समाज पक्षाच्या ‘सोशल इंजिनिअरिंग’ची नेहमीच चर्चा होत असली तरी हे उमेदवार पक्षाबाहेर गेल्याची अनेक उदाहरणे आतापर्यंत घडली आहेत.
‘सोशल इंजिनिअरिंग’चा गाजावाजा प्रत्येक निवडणुकीत होत असतो. किंबहुना हा शब्दच बसपने रुढ केला आहे. प्रत्येक निवडणुकीत बसपच्या ‘सोशल इंजिनिअरिंग’ समीकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असते. या समीकरणाचा वापर फक्त निवडणुकीपुरताच केला जातो, असे ठाम मत राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे या समीकरणात बसणारे जे जे नेते बसपने आणले त्यातील बहुतांश नेत्यांनी निवडणुका झाल्यानंतर पक्षाला रामराम ठोकल्याचे गेल्या काही निवडणुकांवरून स्पष्ट झाले आहे.
‘सोशल इंजिनिअरिंग’चा पहिला प्रयोग भारतीय जनता पक्ष व त्यानंतर भारिप बहुजन महासंघ आणि रिपाइंने केल्याचे राजकीय जाणकार सांगतात. भाजपला काही ठिकाणी यश आले आहे. विदर्भात या पक्षाच्या वाढत्या जनाधाराचे मूळच ‘सोशल इंजिनिअरिंग’ मध्ये दडले आहे, मात्र त्याची चर्चा झाली नाही. बसपने उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत या समीकरणाचा अवलंब केला नि या पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्यामागे हेच समीकरण कारणीभूत ठरल्याने या लोकसभा निवडणुकीत पुरोगामी महाराष्ट्रात हे समीकरण किती प्रभावी ठरू शकते याचे आडाखे सध्या राजकीय जाणकार बांधत आहेत.
सर्वाना सोबत घेऊन जाणारे असे हे ‘सोशल इंजिनिअरिंग’चे समीकरण असल्याचे बसपचे पुढारी सांगत असले तरी त्यापूर्वी याच समीकरणाच्या आधारे या पक्षात आलेले पुढारी फार काळ पक्षात टिकू शकले नाहीत. निवडणुका आल्या की विविध राजकीय पक्षांची उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न राजकीय पुढारी करतात. त्यातही सर्वाधिक प्राधान्य बसपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी असतो. निवडणूक संपली की पक्ष सोडायचा असेच चित्र विदर्भात दर निवडणुकीच्या वेळेस पाहायला मिळते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत बसपच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे हा पक्ष विदर्भात मोठी शक्ती म्हणून उदयास येईल, असा होरा अनेकांनी बांधला होता. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, रामटेक या लोकसभा मतदारसंघात ५० हजार ते १ लाख मते बसपच्या उमेदवारांनी घेतली होती. नंतर मात्र या सर्व प्रमुख उमेदवारांनी पक्ष सोडला.
रामटेक येथून याआधी लढणारे चंदनसिंह रोटेले, वर्धा येथून लढणारे सोमराज तेलखेडे, चंद्रपूर येथून लढलेले राजेंद्र वैद्य, नागपूर येथून लढलेले जयंत दळवी या सर्वानी निवडणुकीनंतर बसपला रामराम ठोकला. दळवी, रोटले हे काँग्रेसमध्ये, राजेंद्र वैद्य हे राष्ट्रवादीत तर तेलखेडे हे भाजपत गेले. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही असेच चित्र होते. काँग्रेसचे राजेश तांबे, किरण पांडव, भाजपचे अशोक गोयल यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून बसपत प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली. मात्र, हे सर्व पराभूत झाले. काही कालावधीनंतर राजेश तांबे भाजप, अशोक गोयल आणि किरण पांडव राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर किरण पांडव यांनी शिवसेनेकडून काटोलमधून विधानसभा निवडणूक लढविली. गेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदार संघात बसपचे उमेदवार प्रकाश टेंभुर्णे हे तिसऱ्या क्रमांकावर होते. यंदा मात्र ते काँग्रेसवासी झाले आहेत.
‘सोशल इंजिनिअरिंग’ समीकरणातील बहुतांश नेत्यांचा बसपला रामराम
निवडणूक आली की बहुजन समाज पक्षाच्या ‘सोशल इंजिनिअरिंग’ची नेहमीच चर्चा होत असली तरी हे उमेदवार पक्षाबाहेर गेल्याची अनेक उदाहरणे आतापर्यंत घडली आहेत.
First published on: 28-03-2014 at 08:07 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsps leaders leavint the party