शुक्रवारी पार पडलेल्या मतमोजणीत रामटेक लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाच्या मतात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही बाब विशेषत: काँग्रेससाठी चिंता निर्माण करणारी ठरली, तर भाजप व सेनेच्या गोटात आनंद निर्माण करणारी ठरली आहे.
२००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत बसपचे उमेदवार प्रकाश टेंभूर्णे यांनी ५५ हजार मते घेतली होती. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रकाश टेंभूर्णे हे काँग्रेसवासी झाले. परंतु टेंभूर्णे यांचा काँग्रेसचे उमेदवार वासनिक यांना कुठलाही फायदा झालेला दिसत नाही. पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बसपने किरण रोडगे-पाटणकर यांना उमेदवारी दिली. किरण रोडगे-पाटणकर या महापालिकेत इंदोरा भागाच्या बसपच्या नगरसेविका आहेत. तसेच त्या कव्वाल म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्य़ात परिचितच होत्या. त्यांनी ९५ हजार ०५१ मते मिळवून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांना टेंभूर्णे यांच्यापेक्षा ४० हजार मते अधिक मिळाल्याचे दिसून येते. तसेच प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीत रामटेक मतदारसंघात बसपच्या उमेदवाराच्या मतामध्ये वाढ होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर प्रथमच लढत असलेल्या आम आदमी पक्षाकडून प्रताप गोस्वामी रिंगणात होते. ते किमान ५० हजाराच्या जवळपास मते घेतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु त्यांना केवळ २५ हजार ८८९ मतांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे आपचाही फुगा फुटला. बसपचा उमेदवार जेवढी जास्त मते घेईल, तेवढा भाजप किंवा सेनेच्या उमेदवारांना फायदा होतो, असे म्हटले जाते. परंतु हा न्यायही येथे चालला नाही. वासनिक यांना मिळालेल्या ३ लाख ४४ हजार १०१ मतांच्या पारडय़ात पाटणकर यांची ९५ हजार ०५१ मते जरी टाकली तरी तुमाने यांना मिळालेल्या ५ लाख १९ हजार ८९२ मतांची बरोबरी करू शकत नाही.
वासनिक यांच्या मताधिक्क्यात वाढ झाल्याचे दिसून येत असले तरी ते विजयापासून फार दूरच राहिले. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत वासनिक यांना ३ लाख ११ हजार ६१४ मते मिळाली होती. तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ३ लाख ४४ हजार १०१ मते मिळाली. म्हणजेच गेल्यावेळच्या तुलनेत वासनिक यांच्या मतांमध्ये ३२ हजार ४८७ मतांनी वाढ झाल्याचे दिसून येते. तुमाने यांना २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत २ लाख ९४ हजार ९१३ मते मिळाली होती. तर या निवडणुकीत ५ लाख १९ हजार ८९२ मते मिळाली. त्यांच्या मतांमध्ये चक्क २ लाख २४ हजार ९७९ मतांनी वाढ झाली व त्यांनी वासनिकांपेक्षा १ लाख ७५ हजार ७९१ मते अधिकची घेऊन विजय संपादित केला. ही वाढ काँग्रेसविषयी असलेली चिड व नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा परिपाक असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा