मागील अठरा वर्षांत लोकसभा निवडणुकीत बसपच्या मतांचा आलेख चढताच राहिलेला असून यंदा विदर्भात पन्नास लाखाहून अधिक मते घेत बसप खाते उघडेल, अशी आशा बसप कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.
या पक्षाची स्थापना १९८४ मध्ये कांशीराम यांनी केली. त्यानंतर सर्वप्रथम १९९१ मध्ये लोकसभेच्या विदर्भातील सर्व जागा लढविल्या. या निवडणुकीत बसपला विदर्भातील अकराही लोकसभा मतदारसंघात बसपच्या पारडय़ात एकूण ६९ हजार ५३९ मते पडली. सर्वात कमी म्हणजे ५७१ मते अकोला मतदारसंघात, तर सर्वाधिक म्हणजे १८ हजार ९५८ मते वर्धा मतदार संघात बसपचे श्रीकृष्ण उबाळे यांनी घेतली. १९९६ मध्ये बसपने विदर्भात केवळ वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ या तीनच ठिकाणी उमेदवार उभे केले. या निवडणुकीत वर्धा येथे उबाळे यांनी ४३ हजार ४९१ मते घेतली. या तीन जागी एकूण ७० हजार ७८३ मते बसपने घेतली.
बसपने १९९८ मध्ये विदर्भातील सर्व अकराही जागा लढविल्या. या निवडणुकीत सर्वात कमी ३ हजार १३१ मते बुलडाण्यात, तर सर्वात जास्त रामटेक मतदार संघात ३० हजार ९४९ मते राम हेडाऊ यांनी घेतली. १९९९ मध्ये केवळ पाच जागा लढविण्यात आल्या. त्यात सर्वात कमी ४ हजार ४६३ मते चंद्रपूरमध्ये पडली. सर्वात जास्त १६ हजार ७०६ मते रामटेकमध्ये अशोक सरस्वती यांनी घेतली. २००४ मध्ये सर्व अकराही जागा लढविण्यात आल्या. सर्वात कमी १८ हजार २४९ मते बुलडाण्यात, तर सर्वात जास्त १ लाख ४ हजार ४१६ मते चंद्रपूरमध्ये राजेंद्र वैद्य यांना मिळाली. २००९ मध्ये पक्षाने केवळ नऊ जागी उमेदवार दिले. त्यात सर्वात कमी ४१ हजार ७७५ मते गंगाधर गाडे यांना अमरावतीत, तर सर्वात जास्त १ लाख ३१ हजार ५४२ मते वध्र्यामध्ये बिपीन कंगाले यांना मिळाली.
वर्धा मतदार संघात श्रीकृष्ण उबाळे (१९९१, ९६, ९८,) तीन वेळा, नागपूर मतदारसंघात सिद्धार्थ पाटील (१९९१ व १९९८) दोन वेळा व वाशीममध्ये रवी जाधव (१९९८ व २००४) दोन वेळा यांचा अपवाद वगळता बसपने उमेदवार प्रत्येक निवडणुकीला बदलला आहे. बसपला विदर्भात १९९१ मध्ये ६९ हजार ५३९, १९९६ मध्ये ७० हजार ७८३, १९९८ मध्ये १ लाख ३१ हजार ४७, १९९९ मध्ये ५१ हजार १३५, २००४ मध्ये ५ लाख ५८ हजार ५१०, तर २००९ मध्ये ७ लाख ६० हजार ४६२ मते मिळाली. बसपच्या मतांचा आलेख चढताच राहिलेला आहे. २००४ रोजी बसपने महाराष्ट्रात ४६ जागा लढविल्या. १० लाख ४६ हजार ९१३ मते मिळाली. २००९ ला राज्यात ४७ जागा लढवून १७ लाख ८८ हजार ७२ मते घेतली.
अनेक ठिकाणी बसपचे उमेदवार तिसऱ्या ठिकाणी राहिलेले आहेत. २००९ मध्ये चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदार संघात राजे सत्यवान आत्राम यांनी १ लाख ३५ हजार ७५६, वर्धा लोकसभा मतदार संघात  बिपीन कंगाले यांनी १ लाख ३१ हजार ५४२ व नागपूर लोकसभा मतदार संघात माणिकराव वैद्य यांनी १ लाख १८ हजार ७४१ मते घेतली. माणिकराव वैद्य भाजपमध्ये होते. अगदी निवडणुकीच्या तोंडावर त्यांना बसपने उमेदवारी दिली तरीही त्यांनी लक्षणीय मते घेतली होती. दलित व बहुजन मतांच्या समीकरणावर बसपला हे यश मिळाले आहे. बसपची राजकीय मुळे या मतदारसंघात घट्ट असल्याचे यावरून स्पष्ट होते.
तरुणाईच्या विश्वासावर भरवसा -डॉ. गायकवाड
या पाश्र्वभूमीवर देशभराचे लक्ष असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघात या पक्षाने यंदा गणित विषयात आचार्य पदवी प्राप्त केलेले व शैक्षणिक वर्तुळातील डॉ. मोहन गायकवाड यांना रिंगणात उतरविले आहे. प्रथमच राजकारण, तसेच निवडणूक लढवित असलो तरी पक्षाची मजबूत संघटन बांधणी व वैयक्तिक संपर्क, लक्षणीय मते असलेल्या तरुणाईचा विश्वास या भरवशावर विजय संपादन करू, असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. महागाई व इतर समस्या हे मुद्दे असले तरी स्वतंत्र विदर्भ हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन जनतेपुढे जात असल्याचे ते म्हणाले.

Story img Loader