पाच कोटींची कपात व प्रायोगिक तत्त्वावर ‘ई लर्निग’
िपपरी पालिका शिक्षण मंडळाच्या २०१३-२०१४च्या अंदाजपत्रकात आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुचवलेली पाच कोटींची कपात व पालिका शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘ई लर्निग’ला मान्यता देण्याच्या उपसूचनेसह मंडळाचे १०४ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीने मंजूर केले. मागील आठवडय़ात समितीने अभ्यासासाठी हा विषय तहकूब ठेवला होता.
शिक्षणदिनाच्या कार्यक्रमात पालिका शाळांमध्ये ‘ई लर्निग’ राबवण्याची घोषणा मंडळाने केली होती. त्यानुसार, अंदाजपत्रकात अडीच कोटींची तरतूद सुचवली होती. तथापि, आयुक्तांनी अवघे ५० लाख रुपये उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. यासंदर्भात, सदस्यांची बैठक घेऊन आयुक्तांनी सविस्तर चर्चा केली. ‘ई लर्निग’साठी खासगी संस्था तसेच कंपन्यांशी बोलून शाळा दत्तक घेण्याची विनंती करू, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली. या वेळी शिरीष जाधव, धनंजय भालेकर, चेतन भुजबळ, नाना शिवले आदींनी काही मुद्दे उपस्थित केले. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. नुसत्याच खरेदीसाठी केलेल्या काही तरतुदींनाही आयुक्तांनी कात्री लावली.
मागील बैठकीत अंदाजपत्रक मंजुरीसाठी होते, मात्र स्थायी समितीला त्यावर ‘अभ्यास’ करायचा होता म्हणून हा विषय तहकूब ठेवण्यात आला. प्रशासनाने १०५ कोटी ९५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. मंडळ सदस्यांनी त्यात १०९ कोटी ३८ लाख रुपयांपर्यंत वाढ सुचवली होती, मात्र आयुक्तांनी अनावश्यक खर्चात कपात करण्याची सूचना केली. तथापि, आयुक्तांनी केलेल्या सूचना मान्य करत स्थायीने १०४ कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली.

Story img Loader