चाळकऱ्यांना बिल्डरकडून सापत्नपणाची वागणूक
 आयुक्तांच्या आदेशानंतरही प्रशासन सुस्त
नौपाडा येथील चंद्रनगर भागातील चाळी विकसित करून उभारण्यात आलेल्या तीन टोलेजंग इमारतींपैकी दोन इमारतींमध्ये चाळीतील रहिवाशांना घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र, या तिसऱ्या इमारतीजवळच उद्यान तसेच अन्य सुविधा असून त्याचा दोन्ही इमारतींमधील रहिवाशांना लाभ घेता येऊ नये, यासाठी बिल्डरने या इमारतींच्या मधोमध चक्क भिंतीची ‘लक्ष्मणरेषा’ उभारली आहे. बिल्डरकडून अशा प्रकारे मिळणारी सापत्नपणाची वागणूक आणि आडमुठय़ा धोरणामुळे गेली अनेक वर्षे या दोन्ही इमारतींमधील रहिवासी उद्यान तसेच अन्य सोयीसुविधांपासून वंचित आहेत. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी महापालिकेच्या लोकशाही दिनात ही अनधिकृत भिंत तोडण्याचे आदेश दिलेले असतानाही तिच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. उलट महापालिकेचा संबंधित विभाग कागदी घोडे नाचवत वेळकाढूपणा करीत असल्याचे दिसून आले आहे.
नौपाडा येथील चंद्रनगर भागात तळ अधिक तीन मजली आणि काही बैठय़ा चाळी होत्या. त्यामध्ये सुमारे १५० कुटुंबे वास्तव्यास होती. मात्र, ती चाळ धोकादायक झाल्याने त्या जागी टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या. त्यासाठी तिरुपती डेव्हलपर्स या बिल्डरने रीतसर महापालिकेकडून अधिकृत परवानग्या घेतल्या आहेत. ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा तीन इमारती उभारण्यात आल्या असून यापैकी ‘अ’ आणि ‘ब’ या दोन इमारती एकमेकांना खेटूनच आहेत. त्यामध्ये चाळीतील रहिवाशांना घरे देण्यात आली आहेत. या ठिकाणी २००८ पासून चाळीतील रहिवाशी राहत आहेत, तर या दोन्ही इमारतींच्या समोरील बाजूस ‘क’ ही विक्रीसाठी इमारत उभारली आहे. या इमारतीच्या जवळच उद्यान तसेच अन्य सोयीसुविधा बिल्डरने उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, संबंधित बिल्डरने ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या इमारतीच्या मधोमध समांतर भिंत उभारून त्यावर वायरचे जाळे टाकले आहे. त्यामुळे या भिंतीच्या पल्याड म्हणजेच ‘क’ या इमारतीच्या हद्दीत उद्यान तसेच अन्य सुविधा गेल्या आहेत. त्यामुळे अशा सुविधांपासून ‘अ’ व ‘ब’ या इमारतींतील रहिवाशांना वंचित राहावे लागत आहे, अशी माहिती चंद्रनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे यांनी दिली.
या संदर्भात, बिल्डरकडे अनेक तक्रारी केल्या, पण त्याने कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडे तसेच लोकशाही दिनात तक्रारी केल्या. दरम्यान, लोकशाही दिनात आलेल्या तक्रारीवरून महापालिका तत्कालीन आयुक्तांनी ‘ती’ भिंत तोडण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. मात्र, तीन वर्षांचा काळ लोटला तरी लोकशाही दिनाचा आदेश अद्यापही कागदावरच आहे. विशेष म्हणजे, या इमारतींच्या मंजूर नकाशामध्ये या भिंतीचा उल्लेखही नाही. असे असतानाही महापालिका प्रशासनाकडून ‘त्या’ भिंतीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. उलट या भिंतीवरून महापालिकेची नौपाडा प्रभाग समिती संबंधित विभागांना कागदोपत्री व्यवहार करण्यात अडकले आहेत, असेही वाघमारे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा