महालाचे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात झोपडी विकणाऱ्या बिल्डरांच्या चित्तरकथा सामान्यांना नवीन नाहीत. राजकीय नेते आणि प्रशासनालाही खिशात घालणाऱ्या या जमातीच्या ‘उल्लू बनाविंग’ वृत्तीचा अनुभव हवामान खात्यालाही आला. उंचचउंच इमारतींच्या प्रस्तावात रडारची उंची आडवी आल्यावर ‘पाहिजे त्या उंच इमारतीवर रडार बसवा’, असे म्हणणाऱ्या बिल्डरांनी प्रत्यक्षात मात्र ‘निवडता येणार नाही’, अशीच जागा हवामान खात्याला दाखवली. रडारसाठी स्थळ पाहायला गेल्यावर ‘ही जागा कशी अयोग्य आहे’, याची कारणेही बिल्डरांनीच ऐकवल्याने हवामानतज्ज्ञांनी कपाळाला हात लावून घेतला.शहरातील उंच टॉवरमुळे रडारला सिग्नल मिळण्यात अडचणी येत असल्याने महापालिकेने काही टोलेजंग इमारतींचे प्रस्ताव रोखले आहेत. एका-एका फुटाची किंमत लाखो रुपयात असल्याने बिल्डर लॉबीने याविरोधात लगेच कंबर कसून रडारच हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या. ‘रडारला उंच इमारतींचा अडथळा होतो ना, मग ती सर्वात उंच इमारतीवरच लावा.. पाहिजे ती जागा देतो’, असे आश्वासन बिल्डरांच्या संस्थेकडून देण्यात आले. मात्र सध्या नेव्ही नगरमधील १७ मजल्यांच्या अर्चना इमारतीवरील रडार हलवणे अशक्य असल्याने दुसऱ्या रडारचा प्रस्ताव ठेवण्यात आला. नव्या रडारसाठी जागेची तजवीज करण्याची तयारीही बिल्डरांनी दाखवली. त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांमार्फत उंच इमारतीवरील उपलब्ध जागांची यादी हवामानखात्याकडे देण्यात आली. परंतु प्रत्यक्ष इमारतीच्या ठिकाणी गेल्यावर मात्र बिल्डरांच्या अडवणुकीच्या कारभाराचा ‘अंदाज’ हवामान अधिकाऱ्यांना कळला. परळमध्ये सेनापती बापट मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या ‘सनशाइन टॉवर’ या ४० मजल्यांच्या (१७८ मीटर उंच) इमारतीच्या गच्चीवरील जागा पाहण्यासाठी हवामान अधिकारी गेले. गच्चीवर रडारसाठी बांधकाम व त्याखाली यंत्र, संगणक, कर्मचाऱ्यांसाठी जागा लागते. पण हे अधिकारी गच्चीवर पोहोचण्यापूर्वीच ही जागा योग्य नसल्याची ‘कुजबुज’ सुरू झाली. या इमारतीच्या बाजूलाच लोढा ग्रुपचे तब्बल ११७ मजली (४४२ मीटर उंच) ‘वर्ल्ड वन टॉवर’चे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम पूर्ण झाल्यावर ‘सनशाइन’वरील रडारला नाशिकपर्यंतचे काय, पण काही मीटर पलीकडचे सिग्नलही मिळणार नाहीत, असे बिल्डरांकडूनच सांगण्यात आले. या परिसरात आजूबाजूलाही अनेक उंच टॉवर बांधण्याचे प्रस्ताव असल्याचे बिल्डरांकडून कळवण्यात आल्यावर आपल्याला या जागेची पाहणी करण्यासाठी का बोलावले, असा प्रश्न वेधशाळेतील तज्ज्ञांना पडला. आकाशातील वाऱ्यांचा अंदाज घेणारे हवामानतज्ज्ञ जमिनीचे अंदाज बांधणाऱ्या बिल्डरांच्या कारभारामुळे चक्रावले. आरे पवईच्या डोंगरावरील जागांचे प्रस्ताव हे तेथील जागा ताब्यात घेण्यापासून, रस्ते, बांधकाम, वीज, पाणी पुरवठा अशा लांबचलांब बाबींसाठी सध्या बाजूला ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर उंच इमारतींचे पर्यायही खोलात जाणारे असल्याचा अनुभव हवामानतज्ज्ञांना आला.