कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील शंभराहून अधिक बिल्डर, उद्योजकांनी महापालिकेच्या मालमत्ता कराची सुमारे २५ कोटी रुपयांची रक्कम थकविल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक बिल्डरांचे कल्याण-डोंबिवलीत मोठे गृह प्रकल्प सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या बडय़ा उद्योजकांकडून मालमत्ता कराचा भरणा होत नसला तरी त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक महापालिकेस दाखविता आलेली नाही. आता काही वर्तमानपत्रांमधून थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करून वेळ मारून नेण्याचा प्रकार मालमत्ता कर विभागातील काही अधिकाऱ्यांनी सुरू केला असून या थकबाकीदारांना नोटिसा बजाविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
महापालिका प्रशासनाने या थकबाकीदारांची यादी मोठय़ा चलाखीने इंग्रजीतून प्रसिद्ध केली आहे. यापूर्वी थकबाकीदारांची यादी मराठीतून प्रसिद्ध करणाऱ्या मालमत्ता कर विभागाने यावेळी इंग्रजीतून यादी प्रसिद्ध करून नेमके काय साधले, याची चर्चाही आता महापालिका वर्तुळात रंगली आहे. मालमत्ता कर थकविणाऱ्या मोठय़ा थकबाकीदारांमध्ये बडय़ा बिल्डरांचा समावेश आहे. या बिल्डर मंडळींना महापालिकेने यापूर्वी वेळोवेळी कर भरणा करण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. परंतु, या नोटिसांची दखल घेण्यात आलेली नाही. एरवी सर्वसामान्य थकबाकीदारांच्या मुसक्या आवळणाऱ्या मालमत्ता कर विभागाने या बडय़ा थकबाकीदारांविरोधात इतके दिवस कारवाई का केली नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कर विभागाचे साहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले, कर विभागात थकबाकीदारांची यादी इंग्रजीतून करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे मराठीत भाषांतर करून वेळ घालविण्याऐवजी ती जाहिरात आहे तशीच इंग्रजीतून प्रसिद्धीसाठी दिली आहे.
जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर म्हणाले, कर विभागातून जी थकबाकीदारांची यादी आली ती आहे तशीच जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केली आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असा दावाही ठाकूर यांनी केला.
थकबाकीदारांची यादी -:
कुंडलिक मिरकुटे व इतर (३ कोटी २२ लाख), बिल्डर हसमुख पटेल, कोकण वसाहत (२ कोटी २३ लाख), गिरण्या ढोणे व अशोक गंगवाणी (१ कोटी ८६ लाख), बाळाराम चौधरी व प्रफुल्ल शहा (८ लाख १३ हजार), काथोड कारभारी व मुकुंद पटेल (१ कोटी १९ लाख), राधिका बोरगावकर व एम. व्ही. कुलकर्णी (५१ लाख १८ हजार), विनय कारिया व जोहर झोजवाला (४६ लाख ३९ हजार), अभिमन्यू बी. गायकवाड (४२ लाख ३० हजार), उद्योजक संदीप पटेल (४० लाख ५० हजार), चंद्रकांत भगत व अशोक जोशी (३५ लाख २६ हजार), गणेश सोसायटी व जगदीश वाघ (२८ लाख १३ हजार), नितीन पोटे व जगदीश वाघ (२६ लाख ६९ हजार), मंगेश डेव्हलपर्स (२२ लाख ३७ हजार), बुधाजी म्हात्रे व प्रफुल्ल शहा (१९ लाख ७८ हजार), के. आर. सिंग व काल्पन सरोज (१८ लाख ७६ हजार), मे. निर्मल लाइफ स्टाइल (१७ लाख ९८ हजार), नमिता जोशी व रमेश म्हात्रे (१५ लाख ६७ हजार), पॉप्युलर इंडस्ट्री (१३ लाख ६५ हजार), शरदचंद्र ओक व डी. एस. पाटील (१३ लाख ५६ हजार), गणपत पाटील व प्रवीण नंदू (११ लाख ८९ हजार), लक्ष्मण म्हात्रे व नवीन एस. सिंग (१० लाख ५४ हजार), विष्णू गायकवाड व मनोज राय (१० लाख ४५ हजार), सूर्यकांत संगोई (१० लाख २१ हजार), केशव चावरे व जगदीश वाघ (१० लाख १९ हजार), सत्यसाई बुक पब्लिकेशन ट्रस्ट ३३ लाख ९० हजार.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा