पहाट फटफटत असतानाच अचानक मोठ्ठा आवाज झाला आणि धुळीचा लोट उठला. साखरझोपेत असलेले डॉकयार्डवासी खडबडून जागे झाले आणि एकच गोंधळ उडाला. धोकादायक अवस्थेत तग धरून उभी असलेली बाजारखात्याची चार मजली इमारत एका क्षणात होत्याची नव्हती झाली होती.
माझगावकर पुरते जागे होण्यापूर्वीच इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पाठोपाठ अग्निशमन दलाचे बंब एका पाठोपाठ घटनास्थळी येऊन पोहोचले. मात्र चिंचोळ्या रस्त्यामुळे बंब आत येऊ शकत नव्हते. अखेर एक दुकान तोडून रस्ता तयार करावा लागला. पालिकेचे वरिष्ठ अधिकारीही लगेच येऊन पोहोचले. थोडय़ाच वेळात ढिगारा उपसण्याचे काम सुरू झाले आणि लगेचच त्याने वेगही घेतला. मदतकार्य सुरू झाल्यावर एकेक रहिवाशी सापडू लागला तसतसे त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी सुटकेचा नि:श्वास टाकू लागले. मात्र जे आतमध्ये अडकले होते त्यांच्यासाठी घशात आवंढा अडकतच होता. अनेक जण परिसरातच तळ ठोकून होते. इमारतीत राहणाऱ्या ‘आपल्या माणसा’चा भिरभिरत्या नजरेने शोध घेताना अनेकांना दु:ख अनावर होत होते. महिला तर ढसाढसा रडत होत्या. त्यांचा आक्रोश बघवत नव्हता.
पोकलेनच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू झाले. ढिगाऱ्यातील डेब्रिज भरून ट्रक रवाना होऊ लागले. त्याच वेळी दुसरीकडे एनडीआरएफचे जवान आणि अग्निशमन दलाचे पद्धतशीर काम करून हळूहळू ढिगाऱ्याखालील रहिवाशांना बाहेर काढत होते. मानवी हालचालींचा अंदाज घेण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापरही करण्यात येत होता. मात्र जसजसा दिवस चढू लागला तसतशी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांबद्दल चिंता वाढू लागली. दोन-अडीचच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मदतकार्यात अडथळा निर्माण झाला. परंतु पावसाची फिकीर न करता एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे काम अव्याहत सुरूच राहिले. मात्र दिवस मावळतीकडे झुकू लागला तसा अद्याप बाहेर येऊ न शकलेल्यांच्या आप्तांचा धीर खचू लागला. ‘आपलं माणूस’ ढिगाऱ्याखाली सुरक्षित असेल, असा आशावादच त्या परिस्थितीत साथ देत होता.
सकाळपासून मदतकार्यात व्यस्त असलेले अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान, पोलीस, पालिका कर्मचारी उन्हाच्या तडाख्याने आणि पावसाच्या माऱ्याने त्रस्त झाले होते. त्यामुळे या परिसरातील सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांनी पिण्याच्या पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली होती. मदतकार्यात व्यस्त असलेल्यांना दोन घास खाऊन घेण्याची विनंती केली जात होती.
इमारतीचा इतिहास
पालिकेच्या बाजार खात्याची ही चार मजली इमारत १९८० च्या दशकात बांधण्यात आली. बाजार खात्यातील चतुर्थश्रेणी कामगारांच्या निवासाची व्यवस्था या इमारतीत करण्यात आली. या इमारतीच्या तळमजल्यावरील गोदाम पालिकेच्या परवानाधारक जयहिंद डेकोरेटरला भाडय़ाने देण्यात आले होते. प्रत्येक मजल्यावर सात अशा एकूण २८ सदनिका या इमारतीमध्ये होत्या. त्यापैकी दोन सदनिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि विद्युत विभागाचा कर्मचारी राहात होता. उर्वरित २१ सदनिकांमध्ये बाजार खात्यातील कामगार, हलालखोर आणि शिपाई आपल्या कुटुंबकबिल्यासह या इमारतीच्या आश्रयाला होते.
दैव बलवत्तर म्हणून..
बाजार खात्यातील हलालखोर नारायण पडाया याच इमारतीमध्ये राहात होते. परंतु काही दिवसांपूर्वी ते आपल्या कुटुंबासह नातेवाईकांकडे गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंदच होते.  पहाटे इमारत कोसळली आणि पडाया यांनी घराकडे धाव घेतली. घर उद्ध्वस्त झाल्याचे दु:ख करायचे की संपूर्ण कुटुंब सुखरूप राहिल्यामुळे देवाचे आभार मानायचे हेच त्यांना कळत नव्हते.
संरचनात्मक तपासणीबाबत प्रश्नचिन्ह
महापालिकेने आपल्या धोकादायक इमारतींची वर्गवारी केली असून त्यामधील ‘सी-२’ श्रेणीमध्ये दुर्घटनाग्रस्त इमारतीचा समावेश होता. मग ही इमारत कोसळली कशी, असा संतप्त सवाल घटनास्थळी उपस्थित पालिका कर्मचारी करीत होते. मोडकळीस आलेल्या आपल्या १२० इमारतींची पालिकेने वर्गवारी केली होती. त्यापैकी ७८ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यांच्या समावेश ‘सीसी – १’ श्रेणीत करण्यात आला होता. शुक्रवारी पहाटे कोसळलेल्या इमारतीची संरचनात्मक तपासणी करुन ती ‘सी-२’ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. ही इमारत कोसळल्यामुळे संरचनात्मक तपासणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इमारती एवढय़ा लवकर कोसळतातच कशा?
डॉकयार्डची इमारत ८० च्या दशकात बांधण्यात आली होती. जेमतेम ३० वर्षे जुनी इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. २-३ महिन्यांपूर्वीच तेथून जवळच असलेली माझगाव न्यायालयाची इमारत भर दुपारी कामकाज सुरू असताना अचानक रिकामी करावी लागली. मुंब्रा, दहिसर येथील इमारतीही फार जुन्या नव्हत्या. मुंब््रय़ाच्या इमारतीचे तर काम पूर्णही झाले नव्हते. अशा परिस्थितीत मुंबईकरांना एक प्रश्न सतावतो आहे, ‘या इमारती एवढय़ा लवकर कोसळतात कशा?’
मुंबईमधील इमारतींमध्ये मुख्यत्वे दोन प्रकार दिसतात. शीव ते लालबाग या पट्टय़ात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाच्या दोन्ही बाजूला शहर नियोजन योजनेअंतर्गत (टीपीएस- टाऊन प्लॅनिंग स्कीम) हजारो इमारती बांधण्यात आल्या आहेत. या साऱ्या इमारती १९२० ते १९५० या कालावधीत बांधल्या गेल्या आहेत. मरिन ड्राइव्हवरील इमारतीही साधारण याच काळात बांधण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर शहर आणि उपनगरांतही त्याच काळात बांधल्या गेलेल्या आणि आरसीसी तंत्रज्ञानाचा वापर झालेल्या हजारो इमारती आहेत. यातील काही मोडकळीस आल्या असल्या तरी अनेक इमारती आजही भक्कमपणे उभ्या आहेत. ७० ते  ९० वर्षे या इमारतींना होऊन गेली आहेत. (फोर्ट परिसरातील १०० वर्षांहून जुन्या इमारतींची तर गोष्टच वेगळी!)
इमारतींचा दुसरा प्रकार आहे ७० च्या दशकानंतर बांधल्या गेलेल्या इमारतींचा. यातील मोठय़ा प्रमाणावर इमारती निकृष्ट दर्जाच्या आहेत. त्यातही ८० च्या दशकातील इमारती विशेष बदनाम आहेत. अंतुले यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील सिमेंटवरील नियंत्रणामुळे निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरून बांधल्या गेलेल्या या इमारती म्हणजे मृत्यूचे सापळेच आहेत. परंतु त्या काळाच्या आधी आणि नंतरही बांधलेल्या हजारो इमारती एवढय़ातच राहण्यास धोकादायक बनल्या आहेत. याच प्रकारात म्हाडाच्याही बहुसंख्य इमारती येतात. वास्तविक आरसीसी इमारतींचे आयुष्यमान किमान ६० वर्षे असायलाच हवे. मग या इमारती १० ते ३० वर्षे एवढय़ा अल्पकाळात कोसळतात याला जबाबदार कोण?
स्थापत्य अभियंते, कंत्राटदार आणि सरकारी अधिकारी ही भ्रष्ट साखळी या सगळ्याच्या मुळाशी आहे. विशेष म्हणजे या निकृष्ट इमारतींमध्ये सार्वजनिक बांधकाम खाते, म्हाडा, महापालिका यांच्या इमारती मोठय़ा प्रमाणावर आहेत.
आरसीसी इमारतींचे किमान वय ६० वर्षे
आरसीसी तंत्रज्ञानाने बांधलेल्या इमारती किमान ६० वर्षे टिकायलाच हव्यात, असे स्पष्ट मत संरचना अभियंते चंद्रशेखर खांडेकर यांनी व्यक्त केले. भेसळयुक्त सिमेंट आणि रेती, प्रत्यक्ष बांधकाम प्रक्रियेचा निकृष्ट दर्जा या मूळ कारणांबरोबरच इमारत बांधून झाल्यानंतर त्यात मूलभूत संरचनात्मक बदल (स्ट्रक्चरल चेंजेस) करणे, तिची नियमित देखभाल न करणे आणि चुकीच्या पद्धतीने वापर करणे आदी कारणांमुळे इमारत कोसळू शकते, असे खांडेकर यांचे म्हणणे आहे. अनेक रहिवाशी गॅलऱ्यांमध्ये कपडे धुणे, भांडी घासणे ही कामे करतात. पाण्याचा असा अर्निबध वापर इमारतीच्या मुळावर येतो, असे ते म्हणाले.
’ ताईच्या हातची खीर खायची राहून गेली..
मी नेहमी ताईकडे यायचो. दोनच दिवसांपूर्वी ताईने मला फोन करून घरी बोलावले होते. तिच्या हातची खीर खायची होती.. पण आता माझी ताई मला दिसत नाहीए..पाणावलेल्या डोळ्यांनी राहुल कांबळे सांगत होता. वरळीच्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या राहुलची बहिण ज्योती चेंदवणकर दुर्घटनाग्रस्त इमारतीत रहात होती. ज्योतीचे पती अजय चेंदवणकर या दुर्घनेतून सुखरूप बचावले. मात्र ज्योतीसह त्यांच्या दोन मुली प्रांजली (१०) आणि प्रज्वल (८) अद्याप सापडलेल्या नाहीत. ज्योतीचे वडील जगन्नाथ कांब़ळे आणि आई हताशपणे ढिगारे उपसताना पाहत होते. ती सुखरूप बाहेर निघेल अशी आशा त्यांना वाटते आहे. सकाळपासून ते जागचे हललेले नाहीत.
’ देव तारी त्याला कोण मारी.
दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये अनेक कुटुंबे संपूर्ण गाडली गेली आहेत. परंतु ३ वर्षांची भाग्यश्री कांबळे मात्र सुखरूप बाहेर पडली. दुपारी बाराच्या सुमारास भाग्यश्रीला एनडीएफच्या जवानांनी ढिगाऱ्यातून बाहेर काढले. ती पलंगाखाली होती. तिच्या शरीरावर एकही जखम नव्हती.
’ १० तास ढिगाऱ्याखाली सुखरुप.
इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि घटनास्थळी केवळ ढिगाऱ्याचा डोंगर उभा राहिला होता. सुरवातीला काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. नंतर जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी आणखी कोणी सुखरूप बाहेर येण्याची आशा मालवू लागली.  पण वाघमारे कुटुंबातील ३ जण सुदैवी ठरले. १० तासांनतरही ते ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर आले होते. जवानांनी ढिगारे उपसून मदतकार्य सुरू केले तेव्हा वाघमारे कुटुंबातील संजय, त्यांची पत्नी राजश्री आणि मुलगी हर्षदा यांना संध्याकाळी सुखरूप बाहेर काढण्यात आले. वाघमारे कुटुंबीय फुले मंडईजवळ पालिकेच्या इमारतीत राहत होते. तेथे पाण्याची समस्या असल्याने काही महिन्यांपूर्वीच ते या इमारतीत रहाण्यासाठी आले होते. पण संजय वाघमारे यांचे वडील पांडुरंग यांचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा