पूर ओसरल्यानंतर आता घरांची पडझड सुरू झाली असून जिल्ह्य़ात आतापर्यंत २५ हजार घरे कोसळली आहेत. रैय्यतवारी कॉलरीत पुरामुळे तयार झालेल्या दलदलीत एक घर जमिनीत ३० फूट खोल गेले, तर गुजराती समाज भवन व शहरातील अनेक इमारती कोसळल्या आहेत. पुराचा फटका १ हजार ७ गावांना बसला असून स्थलांतरित कुटूंबांची संख्या २० हजारावर आहे. दरम्यान, पुरामुळे दरुगधी सुटल्याने रोगराईची भीती व्यक्त होत आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान चंद्रपूर जिल्ह्य़ात झाले आहे. या जिल्ह्य़ात पंधरवडय़ात तिसरा पूर आल्याने ही भयंकर परिस्थिती ओढवली आहे. आता पूर ओसरल्यानंतर उध्वस्त संसाराची घडी सावरण्यात पूरग्रस्त व्यस्त असतांना घरांची पडझड सुरू झाली आहे. गेल्या तीन दिवसात तर शहर व ग्रामीण भागात २५ हजार घरे कोसळल्याची माहिती सर्वेक्षण करणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिली. जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार जिल्ह्य़ात आतापर्यंत ९ हजार ४०४ घरे अंशत:, तर १ हजार ५६१ घरे पूर्णत: कोसळली आहेत. मात्र, सर्वेक्षण सुरू असल्याने यात आणखी भर पडणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तिकडे पुरामुळे दलदल तयार झाल्याने रैय्यतवारी कॉलरीतील फुकट नगरातील रूपाली सरकार यांचे घर जमिनीत ३० फूट खोल गेले. जमिनीच्या आत अचानक घर गेल्याने सर्वत्र हाहाकार उडाला आहे, तर कस्तुरबा गांधी मार्गावरील गुजराती समाज भवनाची ३० वष्रे जुनी इमारत आज पहाटे कोसळली. सुदैवाने तेव्हा आजूबाजूला कुणी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. बाजार वॉर्ड प्रभागात ताराबाई मोरे या महिलेचे घर कोसळले. विशेष म्हणजे, या घराचा ढिगारा आजूबाजूच्या घरात पडला असून सलग एक दोन दिवस पाऊस झाला तर संपूर्ण घर कोसळल्याची भीती परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. मनपा व जिल्हा प्रशासनाला परिसरातील लोकांनी घर कोसळल्याची माहिती दिली असली तरी कारवाईसाठी मोठय़ा घटनेची प्रतीक्षा करत आहेत काय, असा प्रश्न मनपाला केला आहे.
हीच परिस्थिती शहरातील असंख्य वस्त्या व प्रभागांमध्ये दिसून येत आहे. नदी काठावरील वस्त्यांमध्ये तर बिल्डरांच्या फ्लॅट स्कीम्सा पडायला आल्या आहेत. पठाणपुरा गेटबाहेरील राजनगरात तर सलग तीन दिवस पुराच्या पाण्यात होते. त्यामुळे या इमारतीलाही धोका आहे. रहमतनगर, सिस्टर कॉलनी, ठक्कर कॉलनी, हवेली गार्डन, विठ्ठल मंदिर, पठाणपुरा, फुकटनगर, टायर मोहल्ला, ओंकारनगर, स्वावलंबीनगरात तर अनेक धोक्याच्या इमारती आहे. या जिल्ह्य़ाा १ हजार ७ गावांना पुराचा फटका बसलेला आहे. पुरामुळे २४ लोकांचा मृत्यू झाला असून १४१ पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहे. सातत्याने पाऊस सुरू असल्याने सर्वेक्षणाचे काम पूर्ण होण्यास आणखी आठवडाभराचा अवली लागणार आहे. त्यामुळे या आकडय़ात निश्चितच वाढ होणार आहे. त्यामुळे आणखी घरांची पडझड होण्याची शक्यता आहे.
पावसामुळे २० हजार कुटूंबांचे स्थलांतरण झाले आहे. आता पूर ओसरल्यानंतर काल रविवारपासून स्थलांतरित पूरग्रस्त घरी परतू लागले आहेत. संसाराची घडी नीट बसविण्याचे कार्य सुरू असतांनाच पूरग्रस्त भागात दरुगधी सुटल्याने रोगराईची भीती व्यक्त केली जात आहे. पूरग्रस्त भागात रोगराई होऊ नये म्हणून मनपा व जिल्हा प्रशासनाने सफाईचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी पूरग्रस्तांनी केली आहे.
पाऊस सुरूच
दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज दुपारी १२ वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. सलग दोन तास पाऊस कोसळल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पूरग्रस्त तीन दिवसानंतर काल रविवारी घरी परतल्यानंतर आज पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने लोक आता पावसाला अक्षरश: कंटाळले आहेत.