मनुष्यप्राण्याचा विद्रुप चेहरा
स्व-अस्तित्व टिकविण्याची धडपड आणि शरीराच्या भुका भागविण्याची आस या दोनच संवेदना बहुतेक प्राण्यांमध्ये आढळून येतात. काही अपवादात्मक प्राण्यांमध्ये सत्तावर्चस्वाची जाणीव आढळते; नाही असं नाही. परंतु त्याबाबतीतल्या संघर्षांचा एकदा का निकाल लागला, की पराभूत प्राणी वास्तव स्वीकारून बाजूला होतो. मनुष्यप्राण्याचं तसं नाही. त्याला बुद्धिमत्ता आणि भावना या दोन अधिकच्या शक्ती प्राप्त असल्यानं तो आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टीही हरप्रकारे साध्य करू इच्छितो. त्यासाठी तो वाट्टेल त्या थराला जातो. उपजत बुद्धी, बळ आणि कुटील नीतीचा त्यासाठी अवलंब करतो. आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यानंच निर्माण केलेले कायदेकानू आणि नैतिक-अनैतिकतेचे संकेतही तो प्रसंगी धाब्यावर बसवतो. वेळ पडल्यास जंगलचा कायदाही अंगिकारतो. स्वार्थ, आपमतलब आणि ‘स्व’च्या पलीकडे त्याला कशाचीच तमा वाटत नाही. अशा मनुष्यप्राण्याला आरसा दाखवणारं ‘माणसा माणसा हुप हुप!’ हे नाटक ‘अष्टविनायक’ संस्थेनं नुकतंच रंगभूमीवर आणलं आहे. लेखक अशोक पाटोळे यांनी त्याकरता आपल्या पूर्वजाचा- म्हणजे माकडाचाच वापर नाटकात केला आहे. प्राण्यांमध्ये चिम्पाझी हा अतिशय बुद्धिमान प्राणी मानला जातो. त्याच्यापासून उत्क्रांत होत होत माणूस जन्माला आला. ‘माणसा माणसा हुप हुप!’मध्ये पाटोळेंनी या चिम्पाझीच्या माध्यमातूनच मनुष्यप्राण्याचा विद्रुप, विकृत चेहरा उघड केला आहे. सर्कशीतील आयुष्याला कंटाळलेलं चिंपू माकड संधी मिळताच तिथून पळून जातं. त्याला माणूस व्हायचं असतं. एका सिद्धपुरुषानं दिलेल्या आशीर्वादामुळे त्याला माणसासारखं बोलता येतं. त्या बळावर तो ‘माणसा’त येण्याचा प्रयत्न करतो. परंतु माणसं त्याला घाबरून त्याच्यापासून दूर पळतात. त्याला टाळू बघतात. पोटापाण्यासाठी चिंपू नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण कुणीच त्याला नोकरी देत नाही. शेवटी तो धरमचंद या बिल्डरच्या कंपनीत नोकरी मागण्यासाठी येतो. धरमचंदने चंद्रपूरच्या जंगलासह महाराष्ट्रातील अन्य जंगलांमध्ये गृहप्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. त्यासाठी शासकीय मंजुरीही मिळवली आहे. आता फक्त ती योजना प्रत्यक्षात राबवायची बाकी आहे.
अशात चिंपू त्याच्याकडे काम मागायला येतो. आधी तो त्याला हिडिसफिडिस करून हाकलूनच द्यायला बघतो. परंतु त्याची सेक्रेटरी कम् प्रेयसी शोभा त्याला- चिंपूचा आपल्याला या जंगल प्रकल्पात उपयोग होईल असे सांगते तेव्हा त्याची टय़ुब पेटते. आणि तो या माणसासारखं बोलणाऱ्या माकडाचा आपल्या धंद्यासाठी वापर करायचं ठरवतो. चिंपूला जाहिरातीत वापरून या प्रकल्पाकडे लोकांचं लक्ष वेधण्यात तो यशस्वी होतो. चिंपूला तो आश्वासन देतो की, जंगलातील झाडं आणि प्राण्यांना पूर्णपणे संरक्षण दिलं जाईल. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या अधिवासावर नांगर फिरवूनच हा प्रकल्प साकारणार असतो. धरमचंदची सेक्रेटरी शोभा ही त्याची ठेवलेली बाई आहे. त्याचं लग्न झालेलं आहे. शोभाला लग्नाच्या भूलथापा देऊन तो तिचं शोषण करतो आहे. तीही परिस्थितीच्या कोंडीत सापडल्यानं धरमचंदच्या जाळ्यात अडकलेली आहे. अशात चिंपूसारखा निरागस, भाबडा प्राणी तिच्या सहवासात येतो. साहजिकच तिला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते. ती त्याला ‘माणूस’ बनायला मदत करू पाहते. पण धरमचंदला मात्र चिंपूमध्ये आपला भावी प्रतिस्पर्धी दिसतो. शोभाचं चिंपूमधलं गुंतणं त्याला खुपू लागतं. तो चिंपूचा काटा काढायचं ठरवतो. तो चिंपूला माकडावर संशोधन करणाऱ्या विदेशी शास्त्रज्ञांच्या हवाली करतो. शोभा त्याला विरोध करते. मात्र, ‘माणूस’ बनण्याच्या ध्यासानं पछाडलेल्या चिंपूला काहीही झालं तरी आपण ‘माणूस’ बनल्याचं सर्टिफिकेट मिळवायचं असतं. तो शास्त्रज्ञांसोबत अमेरिकेला निघून जातो.
काही वर्षांनी शास्त्रज्ञांच्या प्रयोगांना यश येऊन चिंपू ‘माणूस’ बनतो. त्याचं नाव ‘चिंतामण पुरुषोत्तम मराठे’ असं ठेवलं जातं. तो एका अमेरिकन फायनान्स कंपनीचा सीईओ म्हणून धरमचंदच्या कंपनीशी त्याच्या जंगलातल्या प्रोजेक्टला अर्थसाहाय्य देण्यासंबंधात बोलणी करायला येतो. ‘माणूस’ झालेल्या चिंपूला शोभा आधी ओळखतच नाही. पण तो जेव्हा आपली खरी ‘ओळख’ तिला देतो तेव्हा ती आश्चर्यानं थक्क होते. आनंदते. चिंपूनं धरमचंदच्या प्रोजेक्टला मदत केल्यास तिथला निसर्ग आणि प्राणी उद्ध्वस्त होतील याची ती त्याला कल्पना देते. चिंतामणी तिला सांगतो की, ‘मी आता वरच्या पोझिशनला आहे, धरमचंदला मी नीट हाताळेन.’ धरमला चिंपूचाच चिंतामणी झाल्याचं माहीत नसतं. तो कर्ज मिळवण्यासाठी त्याच्या सगळ्या अटी मान्य करू, असं म्हणतो. प्रत्यक्षात करारपत्रात मात्र वृक्ष आणि प्राण्यांच्या संरक्षणासंदर्भातील कलम नसतं. चिंतामणी ते घालायला सांगतो. पण धरमला ते परवडणारं नसतं. तो त्याला यातून काहीतरी मार्ग काढा, म्हणून विनंती करतो. पण चिंतामणी आपल्या म्हणण्यावर ठाम राहतो. तेव्हा वाट्टेल त्या मार्गानं आपलं काम साधून घ्यायची सवय लागलेल्या धरमला चिंतामणीचा शोभामधला ‘रस’ लक्षात येतो. तो चिंतामणीला त्याच्या काही ‘व्यक्तिगत’ अटी आहेत का; असल्यास आपण त्याही पुऱ्या करू, असं सांगतो. चिंतामणी त्याला शोभाबरोबर ती रात्र व्यतीत करण्याची इच्छा प्रकट करतो. कर्ज मिळवण्यासाठी धरम शोभाला त्याची रात्री सरबराई करण्यास फर्मावतो. शोभा त्यास नकार देते. तेव्हा धरम तिला धमकावतो. त्यातून धरमचा नीचपणा शोभाला कळून येतो. एव्हाना धरमला चिंतामणीच्या काही कृतींतून त्याच्याबद्दल संशय यायला लागलेला असतोच. तशात तो त्याला मद्य ऑफर करतो. आणि चिंपूही मद्याच्या अमलाखाली वाहवत जाऊन आपलं खरं ‘रूप’ प्रकट करतो. मग तर धरमसाठी सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात. तो शोभाकरवी चिंतामणीकडून करारावर स्वाक्षरी करवून घेतो आणि मग त्याला आपल्या कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करवून ऑफिसबाहेर फेकून देतो. माणूस बनण्यास निघालेल्या चिंपूला त्याची भलीमोठी किंमत मोजावी लागते..
अशोक पाटोळे यांना अफलातून नाटय़कल्पना सुचतात यात शंका नाही. पण त्या कल्पनांचा सुयोग्य वापर करून उत्तम नाटक रचण्यात मात्र ते अनेकदा तोकडे पडतात. इथं मात्र ते एका चांगल्या कल्पनेवर गंभीर, आशयघन नाटक उभं करण्यात बऱ्याचं अंशी यशस्वी झाले आहेत. माकड आणि माणूस यांना आमनेसामने आणून त्यांच्या प्रत्याप्रत्यक्ष तुलनेतून माणसातील क्रूर, हिंस्र, विकृत ‘प्राण्या’चा पर्दाफाश करण्यात आणि प्राण्यांतलं ‘माणूसपण’ अधोरेखित करण्यात त्यांना यश आलं आहे. प्रौढांच्या नाटकात प्राण्याला आणणं तसं धोकादायकच. कारण त्यानं नाटकाचं बालनाटय़ात रूपांतर होण्याची शक्यता होती. तथापि दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी अतिशय संवेदनशीलतेनं केलेल्या नाटकाच्या हाताळणीमुळे ते नाटकाच्या गाभ्याशी प्रामाणिक राहू शकले आहे. मात्र, रचनेच्या अंगानं लेखकाला प्रसंगनिर्मितीत काही अडचणी आल्याचं जाणवतं. बसस्टॉपवरचे सगळे प्रसंग तद्दन खोटे, तकलादू उतरले आहेत. त्यांनी नाटकाचा परिणाम पातळ होतो. तसंच नाटकातील शिपाई सदू हा दुसऱ्या अंकात अचानक ऑफिसातल्या कर्मचाऱ्यांना ‘बैल’ संबोधून त्यांना हिडिसफिडिस करू लागतो. त्याच्यातल्या या आकस्मिक बदलामागचं लॉजिक काय, हे ते नाटककर्तेच जाणोत! सदू पहिल्यापासूनच तसा पवित्रा घेता तर ते एक वेळ समजू शकलं असतं. यातली प्रमुख पात्रं मात्र सणसणीत उतरली आहेत. प्रमुख पात्रांचं रेखाटन, त्यांची मानसिक-भावनिक आंदोलनं, संघर्ष तसंच त्यांचा एकूणच आलेख चढत्या रंगतीनं नाटकात येतो. त्यामानानं दुय्यम पात्रांकडे मात्र लेखकाचं दुर्लक्ष झालं आहे. दिग्दर्शकानंही त्यांची अपरिहार्यता प्रयोगात ठाशीव केलेली नाही. परिणामी विदेशी शास्त्रज्ञ आणि त्यांचं अमेरिकन अॅक्सेंटमधलं बोलणं वगैरे पपलू आणि उबग आणणारं ठरतं. यातला काळाचा संदर्भ हाही असाच एक दुर्लक्षित घटक. धरमचंदच्या कंपनीनं चिंपूला शास्त्रज्ञांच्या हवाली केल्यानंतर किती काळानं त्याचं ‘माणसा’त रूपांतर होतं आणि त्याला ‘चिंतामणी मराठे’ ही नवी ओळख देऊन पुनश्च धरमसमोर पेश करण्यात त्यांचा काय हेतू आहे, हे कळायला मार्ग नाही. मध्यंतरीच्या काळात प्रकल्प पुढे नेण्याकरता धरमचंदनं काहीच केलं नाही का? तसंच ऑफिसात सर्वत्र सीसीटीव्ही बसवलेले असताना चिंतामणी आणि शोभा यांच्यातलं भावनिक संभाषण कॅमेऱ्याद्वारे धरमपर्यंत पोहोचणार, हे शोभाला माहीत असताना दुसऱ्या अंकात शोभा चिंतामणीला त्याबाबत सावध कशी करत नाही? असे काही प्रश्न पडतात. नाटकात बऱ्याच गोष्टी गृहीत धरल्या आहेत. या अर्थानं हे नाटक बेतीवच आहे. दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी मुख्य लक्ष्यापासून नाटक ढळणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली आहे. आशयाच्या अंगानं काही जागाही त्यांनी प्रयोगात ठळक केल्या आहेत. प्रमुख पात्रांना ठसठशीत चेहरा आणि व्यवहार (बिझनेस) देण्यात ते यशस्वी झाले आहेत. परंतु संहितेतील त्रुटी आणि दोष काढून टाकण्यात मात्र त्यांनी लक्ष दिलेलं दिसत नाही. विशेषत: नाटकाच्या रचनेतील काही दोष, प्रसंगांची पुनरावृत्ती, त्यामागचं लॉजिक न दिल्यानं नाटय़परिणाम उणावण्यात होणारी त्याची परिणती या सगळ्याचा विचार त्यांनी करणं अपेक्षित होतं. एक मात्र खरंय, की प्रमुख पात्रं प्रभावी आणि विश्वासार्ह करण्यात त्यांनी कसलीच कसूर सोडलेली नाही. त्यांनी बांधलेल्या चिंपूच्या हालचाली लाजवाब.अजय पुजारे यांचं नेपथ्य नाटकाची मागणी पुरवणारं आहे. स्वत: कुमार सोहोनी यांनी प्रकाशयोजनेतून नाटय़मय क्षण गडद केले आहेत. श्रीकृष्ण खेडेकर (रंगभूषा) आणि महेश शेरला (वेशभूषा) यांनी चिंपू साकारण्यात कमालीची भूमिका बजावली आहे.
अंशुमन विचारे यांना चिंपूच्या रूपानं लाइफ-टाइम रोल मिळाला आहे. त्यांनीही त्याचं सोनं केलं आहे. चिम्पाझीच्या हालचाली, त्याच्या लकबी, बोलणं, ओठांचा चंबू करणं, भावाभिव्यक्ती अशा सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्टींतून त्यांनी अप्रतिम चिंपू साकारला आहे. चिंतामणीच्या भूमिकेतही त्यांनी अत्यंत संयमितपणे भावप्रक्षोभ व्यक्त केला आहे. हॅट्स ऑफ अंशुमन! नंदिता धुरी यांनी ‘हे माझे नव्हे’मध्ये याआधीच आपलं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलं होतंच. यातही त्यांनी शोभाच्या भावनिक-मानसिक उलथापालथींचा उत्कट प्रत्यय देत गारूड केलं आहे. महेश जोशी यांनी धरमचंदची पझेसिव्ह वृत्ती, कुटीलता, क्रौर्य आणि हिंस्रपणा वागण्या-बोलण्या-वावरण्यातून सर्वार्थानं पोहोचवला आहे. सदूच्या छोटय़ाशा भूमिकेतसुद्धा सोमनाथ लिंबरकर लक्ष वेधून घेतात. माणसातील पशुत्व उलगडून दाखवणारं हे नाटक आपला खरा चेहरा जाणून घेण्यासाठी एकदा नक्कीच पाहायला हवं.
‘माणसा माणसा हुप हुप!’
स्व-अस्तित्व टिकविण्याची धडपड आणि शरीराच्या भुका भागविण्याची आस या दोनच संवेदना बहुतेक प्राण्यांमध्ये आढळून येतात. काही अपवादात्मक प्राण्यांमध्ये सत्तावर्चस्वाची जाणीव आढळते; नाही असं नाही. परंतु त्याबाबतीतल्या संघर्षांचा एकदा का निकाल लागला, की पराभूत प्राणी वास्तव स्वीकारून बाजूला होतो. मनुष्यप्राण्याचं तसं नाही. त्याला बुद्धिमत्ता आणि भावना या दोन अधिकच्या शक्ती
First published on: 16-12-2012 at 12:26 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buirsted face of man