दहशतवादी कृत्ये घडविण्यासाठी फार अत्याधुनिक स्फोटके व अन्य साहित्य वापरावे लागत नाही. हैदराबाद स्फोटांनी हे वास्तव पुन्हा एकदा झगझगीतपणे समोर आणले आहे. अवघ्या ५००-६०० रुपयांमध्ये शेकडो लोकांना आयुष्यभर झळ पोहोचविणारा विध्वंसक बॉम्ब बनवता येतो. खरे स्फोटक रसायन आहे ते ‘बहकलेले आणि भडकलेले डोके’. देशविरोधी विचारांनी एकदा माथी भडकली की दहशतवादी कृत्ये करणे तसे सहजशक्य आहे.
हैदराबादच्या दिलसुखनगर येथे झालेल्या दोन बॉम्बस्फोटांत १६ जणांचे बळी गेले. त्या प्रकरणाचा शोध लावून अतिरेक्यांना पकडण्यासाठी आता कोटय़वधी रुपये खर्च होत आहेत. परंतु १६ निरपराधांचे बळी घेणारे हे दोन बॉम्ब प्रत्येकी अवघ्या सहाशे रुपयांत म्हणजे एकूण १२०० रुपयांत तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कारण या बॉम्बमध्ये सुद्घा अमोनियम नायट्रेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या अमोनियम नाटट्रेम्टच्या सहाय्याने अवघ्या ५०० ते ६०० रुपयांत बॉम्ब तयार केला जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. अमोनियम नायट्रेट सहज उपलब्ध होऊ शकते. वाहनांच्या इंजिनांमध्ये वापरले जाणारे ल्युब्रिकंट ऑइल या अमोनियम नायट्रेटसोबत वापरल्यास हव्या त्या तीव्रतेचा घातक बॉम्ब तयार होऊ शकतो.
या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर झाला होता
* हैदराबाद- फेब्रुवारी २०१३ – १६ ठार
* मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट – २६ ठार
* जर्मन बेकरी स्फोट- फेब्रुवारी २०१० – १७ ठार
* जयपूर साखळी बॉम्बस्फोट- २००८ – ८० ठार
* लोकल ट्रेनमधील बॉम्बस्फोट – २००६ – १२ ठार
* घाटकोपर बेस्ट बॉम्ब स्फोट- २००५ – ९ ठार
* मुलुंड आणि विलेपार्ले बॉम्बस्फोट- २००३ – १ ठार
अमोनियम नायट्रेटसोबत काही अन्य साहित्य वापरून घातक बॉम्ब तयार करता येतो. बॉम्ब बनविण्याच्या पद्धती तर इंटरनेटवर आणि यू टयूबवरही सहजी उपलब्ध आहेत. त्यामुळेच समाजविघातक शक्ती त्याचा वापर करू शकतात. प्रशिक्षित अतिरेक्यांसाठी तर ही एक प्रकारे सोयच बनली आहे, असे मत मुंबईच्या बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक (बीडीडीएस) पथकातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.
अमोनियम नायट्रेटमध्ये हे साहित्य हव्या त्या प्रमाणात टाकले पाहिजे तेवढय़ा तीव्रतेचा बॉम्ब तयार होतो. त्यामुळेच आरडीएक्स या स्फोटकापेक्षा अमोनियम नायट्रेडला प्राधान्य मिळत असल्याचे मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या माजी संचालिका डॉ रुक्मिणी कृषणमुती यांनी सांगितले. वाहनात जे ऑईल वापरले जाते त्या ऑईलचाही अमोनियम नायट्रेडबरोबर बॉम्बसाठी वापर होतो. त्याचे मेकॅनिझम जुळवले की खिळे, छोटी दगडी आणि काचा या बंदुकीच्या गोळीपेक्षी तीव्रतेने काम करतात असे त्या म्हणाल्या. ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी असे छोटे बॉम्ब सहज परिणाम साधतात. त्यामुळे अशा बॉम्बना अतिरेकी प्राधान्य देत असल्याची माहिती त्यांनी दिली. अमोनियम नायट्रेटच्या वापरावर प्रतिबंध घालावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहेत
बॉम्बची ‘रेसिपी’
बॉम्बसाठी लागणारे साहित्य
* अमोनियम नायट्रेट- २५ ते ३० रुपये प्रति किलो
* टायमर घडय़ाळ- २०० रुपये
* १ लिटर ल्युब्रिक ंट ऑइल- २५० रुपये प्रति लिटर
* नट बोल्ट आणि खिळे- १०० रुपये
* काचांचे तुकडे, छोटे दगड- विनामूल्य
* किरकोळ वायरी- ५० रुपये
* या साहित्याचे प्रमाण- आवश्यक असलेल्या तीव्रतेनुसार
एकूण खर्च- ५०० ते ६०० रुपये
जनजागृतीसाठी मुंबईत लागणार १ लाख भित्तीपत्रके
हैदराबाद बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. पोलीस यंत्रणा कितीही सक्षम असली तरी शेवटी दोन डोळे आणि कान हेच खऱ्या अर्थाने जागृत राहून काम करू शकतात. त्यामुळेच संशयास्पद वस्तू आणि घातपाती कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी लोकांमध्ये जागृती आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरभर सुमारे १ लाख भित्तीपत्रके लावली जाणार असल्याची माहिती अतिरीक्त पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली. महत्त्वाचे नाके, बसेस, मॉल्स, सिनेमागृह, बसथांबे आदी ठिकाणी ही भित्तीपत्रके लावली जाणार आहेत. त्याद्वारे लोकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येणार आहे.